- मुक्ता गुंडी
आमीर खानचा ‘सिक्रे ट सुपरस्टार’ हा चित्रपट तुम्ही पाहिला आहे का? आपल्या हिंसक वडिलांपासून आईची मुक्तता करण्यासाठी धडपडणारी इन्सिया पाहिली की कौटुंबिक हिंसाचाराचे आरोग्यावर होणारे दोन परिणाम लख्ख दिसतात. पहिला म्हणजे, विवाहित स्त्रीला हिंसाचारामुळे होणारी प्रत्यक्ष इजा आणि घरातील हिंसाचार पाहणाऱ्या लहान मुलांवर होणारा मानसिक आघात. म्हणूनच कौटुंबिक हिंसाचार हा केवळ ‘कायदेशीर प्रश्न’ उरत नाही तर जागतिक आरोग्य संघटना या प्रश्नाला ‘छुपा आरोग्यप्रश्न’ असं संबोधतं. अनेकांचा असा गैरसमज असतो की हिंसाचाराची सुरुवात नवरा-बायकोमधील कडाक्याच्या भांडणानं होते. परंतु हे पूर्णसत्य नव्हे. कौटुंबिक हिंसाचाराची सुरुवात ही एखाद्या अत्यंत क्षुल्लक कारणानं होऊ शकते. उदा. ‘सुनंदा ही एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. तिचा नवरा खासगी कंपनीत आपल्या वरिष्ठ अधिकाºयाशी वाद घालून घरी आला. तेवढ्यात सुनंदाचा मोबाइल फोन मोठ्यानं वाजू लागला. ती स्वयंपाक करीत असल्यानं तो बंद करण्यास वेळ लागला. या कारणानं प्रचंड संतापून तिच्या नवºयानं तिला टीव्हीचा रिमोट फेकून मारला. ज्यामुळे सुनंदाच्या डोळ्याला सूज आली.’ सुनंदा आपली वेदना लपवेल की सांगेल? डॉक्टरकडे जाऊन डोळा तपासून येईल का? डोळ्यास खोल इजा झाली तर उपाय करण्यासाठी नवरा तिला आर्थिक तसेच भावनिक साथ देईल का? कामावर न गेल्यानं पगार कापला गेल्यास त्याचा कुटुंबावर नेमका काय परिणाम होईल? हे उदाहरण वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की कौटुंबिक हिंसाचारामुळे होणारे परिणाम हे अत्यंत वेदनादायी, विविधांगी, खोल आणि दूरगामी असतात.पुरुषी अहंकार, व्यसनाधीनता, ‘मुलगाच हवा’ ही मानसिकता, पुरुषांमधील मानसिक आजार, ताण, कुटुंबाची अब्रू आणि मानसन्मान याविषयीच्या बुरसटलेल्या कल्पना, वैवाहिक कलह, अवास्तव लैंगिक अपेक्षा अशा अत्यंत गुंतागुंतीच्या कारणांमुळे कौटुंबिक हिंसाचाराची सुरुवात होऊ शकते. भारतात केले गेलेले राष्ट्रीय कौटुंबिक स्वास्थ्य सर्वेक्षण असं दर्शवतं की भारतातील जवळजवळ ३३ टक्के स्त्रिया कौटुंबिक हिंसाचाराला सामोºया गेलेल्या असतात. या स्त्रिया केवळ निम्न आर्थिक स्तरातील असतात हा एक गैरसमज असून, भारतातील श्रीमंत घरांतील सुमारे १६ टक्के स्त्रिया या समस्येला तोंड देत आहेत.भारतातील विवाहित महिलांमध्ये लैंगिक हिंसाचाराला सामोºया गेलेल्या महिलांपैकी ८५ टक्के महिलांवर त्यांच्या पतीनेच हिंसाचार केलेला असतो. २००५-०६ च्या या सर्वेक्षणात असंही दिसून आलं की भारतातील ३५ टक्के विवाहित महिलांना शारीरिक हिंसेचा अनुभव आलेला आहे आणि १० टक्के महिलानी लैंगिक हिंसाचार सहन केलेला आहे. या सर्व अनुभवांना सामोºया गेलेल्या महिला विविध प्रकारचे आरोग्याचे प्रश्न घेऊन जगत असतात. लैंगिक आजार, लैंगिक इजा, शरीराचा स्नायू/हाडं अथवा दात तुटणं, हात वा पाय मुरगळणं, भाजल्याच्या जखमा, डोळ्यास होणाºया गंभीर दुखापती अशा विविध प्रकारचे आरोग्याचे प्रश्न हिंसाचाराशी घट्ट बांधले गेलेले आहेत. कौटुंबिक तसेच सामाजिक दबावामुळे या समस्यांकरिता महिला बहुतांश वेळेला डॉक्टरकडे जाणं टाळतात. परंतु कौटुंबिक हिंसाचारामुळे निर्माण होणारे काही आरोग्यप्रश्न हे फारच छुपे असतात. हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांमध्ये निर्माण होणारं नैराश्य, आत्महत्येची प्रवृत्ती तसेच दु:ख पचवण्याच्या मानसिकतेतून तयार होणारी व्यसनाधीनता हे प्रश्न मोकळेपणे बोललेही जात नाहीत.असाच आणखी एक दुर्लक्षिलेला मुद्दा म्हणजे ‘भावनिक हिंसाचार’. भारतातील सुमारे १६ टक्के महिलांनी भावनिक हिंसाचार अनुभवलेला आहे, असं अभ्यास सांगतो. बाहेरील व्यक्तींसमोर पत्नीला अद्वातद्वा बोलणं, पत्नीला किंवा तिच्या जवळच्या व्यक्तींना दरडावणं, धमकावणं आणि तिला सतत कमी लेखणं अशा वर्तनानं स्त्रीच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचून तिच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकतो.‘कौटुंबिक हिंसाचार ही खासगी बाब नाही का?’ असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कुटुंबाचं असं खास विश्व चार भिंतींच्या आत असतं हे खरं असलं तरी कुटुंबव्यवस्था एक सामाजिक व्यवस्था आहे. म्हणून कौटुंबिक हिंसाचाराचे सामाजिक पदर दुर्लक्षून चालत नाही. कायद्याचं सक्षमीकरण हा त्यातील एक महत्त्वाचा उपाय असला तरी तो एकमेव उपाय नव्हे. स्त्रियांकरिता शिक्षण तसेच कौशल्य विकासासाठीच्या संधी उपलब्ध करणं, त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी उपाययोजना करणं, शाळेच्या माध्यमातून लैंगिकतेचे तसेच लिंगभावाविषयी चर्चा करण्यास प्रोत्साहन देणं ही काही महत्त्वाची पावलं आपण उचलू शकतो. डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ, पोलीस आणि समाजसेवक यांच्या एकत्रित सहकार्यानं अनेक शहरांमध्ये कौटुंबिक हिंसाचाराला बळी गेलेल्या स्त्रियांना मदत केली जाते. अनेक स्वयंसेवी संस्था तसेच हेल्पलाइन हिंसाचारानं ग्रस्त महिलांना कायदेशीर मदत करतात. तसेच ज्या स्त्रियांना हिंसाचारामुळे आरोग्यसमस्यांना तोंड द्यावं लागत आहे, अशा स्त्रियांना त्यांच्या कुटुंबाकडून, मित्रमंडळीकडून तातडीनं उपचार घेण्यासाठीही मदत व्हायला हवी.कौटुंबिक हिंसाचार रोखण्याकरिता यात तरुण मुलं, पुरुष यांचाही सहभाग हवाच. तरुण मुलांशी पौरुषत्व, पुरुषी अहंकार, लिंगभाव, लैंगिक अपेक्षा, व्यसनाधीनता, नात्यांमधील बारकावे आणि हिंसाचाराचे समाजावर होणारे परिणाम याविषयी अधिकाधिक चर्चा करून त्यांना याविषयी बोलतं करण्याची गरज आहे, तरच हिंसाचाराचे प्रमाण हळूहळू कमी होत जाईल.आपल्या देशात पोलिओसारख्या अनेक संसर्गजन्य रोगाच्या संपूर्ण निर्मूलनासाठी कसोशीनं प्रयत्न केले गेले, परंतु एक तृतीयांश महिला कौटुंबिक हिंसाचारानं ग्रासलेल्या असताना, आपण अजूनही त्या समस्येकरिता कोणतेच उपाय प्रभावीपणे केलेले दिसत नाही, असा भेदभाव का बरं?
(लेखिका सार्वजनिक आरोग्य विषयाच्या अभ्यासक आहेत gundiatre@gmail.com)