पुणे : गेल्या ५ वर्षांमध्ये भारतात हृदयविकाराचा त्रास असलेल्यांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे. बदलत्या जीवनशैलीप्रमाणेच चुकीच्या आहारपध्दतीमुळे कमी वयात उच्च रक्तदाब, मधुमेह यांसह हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. हृदयविकार दूर ठेवायचा असेल तर साखर आणि कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचे सेवन नियंत्रित असावे आणि दररोज पाच ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. भारतीय लोक दररोज ९ ते १२ ग्रॅमपर्यंत मिठाचे सेवन करत असल्याने हृदयरोगाला लवकर आमंत्रण मिळत आहे.
हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या तीन प्रमुख रक्तवाहिन्यांपैकी एखाद्या रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण झाल्यास रक्तप्रवाह खंडित होतो आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. अडथळ्याच्या तीव्रतेनुसार हृदयविकाराच्या झटक्याची तीव्रता ठरते. बरेचदा रक्तवाहिन्यांमध्ये चीर पडून रक्ताची गुठळी तयार झाल्याने अचानकपणे हृदयविकाराचा झटका येतो. छातीत दुखणे, अचानक घाम येणे, थकवा येणे, चालताना दम लागणे ही हृदयविकाराची काही लक्षणे असून त्याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नितीन पत्की यांनी केले आहे.
ही लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवा :
हृदय किंवा जबड्यातील वेदना
बसल्या ठिकाणी घाम येणे
धाप लागणे, चक्कर, येणे
हाता-पायाला मुंग्या येणे
छातीत दुखणे
थकवा येणे
काय काळजी घ्याल?
- वयाच्या ३० व्या वर्षापासून नियमितपणे आरोग्य तपासणी करून घ्यावी.
- साखर आणि कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांच्या सेवनावर नियंत्रण ठेवावे.
- आहारात दररोज पाच ग्रॅमपेक्षा अधिक मिठाचे सेवन करू नये.
- फास्ट फूडचे अतिसेवन टाळावे.
- आपल्या शारीरिक क्षमतेप्रमाणे दररोज अर्धा ते एक तास व्यायाम करावा.
- मद्यपान, धूम्रपान टाळावे.
भारतामध्ये विशेषत: शहरी भागात हृदयविकाराचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. पन्नाशीनंतर उद्भवणारा आजार आता तिशीच्या उंबरठ्यावर येऊन पोचला आहे. जीवनशैलीतील बदल, चुकीच्या सवयी, मद्यपान, धूम्रपानासारखी व्यसने, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहारविहार अशा विविध कारणांमुळे हृदयविकार कधी आपल्याला कवेत घेईल, याचा अंदाजही बांधता येत नाही. त्यामुळेच आपले हृदय जपणे, दररोजच्या सवयी बदलणे आवश्यक आहे.
- डॉ. अमोल नारखेडे, हृदयरोगतज्ज्ञ