अनेक कारणं असतात, पण त्यामुळेच आपल्याला पुरेशी झोप मिळत नाही आणि झोपेवर खुन्नस काढण्याची आपली खुमखुमी वाढत जाते, याविषयी आपण मागच्या लेखात वाचलं. झोपेशी आपण ‘राग’ धरला आणि झोपेपासून दूर जात गेलो तर काय होऊ शकतं हे कळलं म्हणजे झोपेशी खुन्नस खाण्यापेक्षा तिच्याशी दोस्ती कशी करायची, याचा प्रयत्न आपण स्वत:च करायला लागू.
इतर गोष्टींसाठी वेळ मिळावा, यासाठी आपण खरं तर वेळेशीही संघर्ष करायला लागतो. आपल्या संपूर्ण आयुष्यावरच त्याचा नकारात्मक परिणाम होतो. कमी झोपेमुळे आपल्या विचारांची क्षमता कमी होते. निर्णय घेण्याची क्षमता दुबळी होऊ लागते. दिवसा पेंगुळल्यासारखं वाटायला लागतं. त्यामुळे अख्खा दिवसच वाईट जातो. काम करण्याची इच्छा, शक्ती राहत नाही. प्रॉडक्टिव्हिटी कमी होते. कोणतीही गोष्ट शिकण्याच्या प्रक्रियेत कोलदांडे बसतात. दिवसाच्या पेंगुळगाड्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. त्यामुळे झोपेशी पंगा घेण्याचं आधी बंद करा आणि तिच्या गळ्यात पडा.
कशी कराल झोपेशी दोस्ती?..१- रात्री आपली झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ ठरवून घ्या. साधारणपणे त्याच वेळेला झोपा आणि उठा. २- संध्याकाळी किंवा झोपण्यापूर्वी मद्य, कॅफिन यासारखी पेये घेण्याचे कटाक्षाने टाळा. ३- मोबाइल, टॅबलेट्स, पीसी.. यासारखी इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस तुम्हाला कितीही प्रिय असली, तरी रात्री किमान झोपेपूर्वी अर्धा तास तरी त्यांच्यापासून दूरच राहा.४- रोजचं, त्यातही रात्रीचं आपलं शेड्यूल बिघडणार नाही याची आवर्जून काळजी घ्या.५- ‘रिलॅक्सेशन मेथड्स’चा अवलंब करा. त्याची तंत्रं समजून घ्या. ध्यान, योग, स्ट्रेचिंग, पुस्तक वाचन.. इत्यादी गोष्टी रात्री झोपण्यापूर्वी करा. त्याचं रुटिन लावून घ्या. ६- यामुळे तुमच्या मनावरचा ताण तर हलका होईलच, पण झोपेवर खुन्नस काढण्याची वेळ येणार नाही. ७- आपल्या बेडरुममधलं वातावरण झोपेला आमंत्रण देईल, असं ठेवा. शांतता, कमी प्रकाश, आरामदायी बिछाना.. अशा गोष्टींमुळे झोपेला उत्तेजन मिळेल.८- एवढं करूनही झोप आपलं ऐकायला तयार नसेल, तर डॉक्टरांना मध्यस्थी करायला सांगा..