>> डॉ. पूजा मुळे-इटके
कोरोना नामक संकटाने घेरून जवळ जवळ एक वर्ष झाले, तरी देखील अजूनही या रोगाची व्यापकता आणि जटिलता आपल्याला समजली नाहीये. यामुळे असे निदर्शनास आले आहे की, शरीराच्या कोणत्याही भागामध्ये कुठलेही लक्षणे किंवा रोग हे पोस्ट कोविड (कोविड झाल्यानंतरचे) कॉम्प्लिकेशन्स असू शकतात. उदाहरणार्थ, कोविड संक्रमणानंतर हृदय, यकृत, मूत्रपिंड, दात आणि जबडे, डोळे इत्यादींसारख्या विविध अवयव आणि प्रणालींवर परिणाम होण्याची प्रकरणे बऱ्याच प्रमाणात आढळून येत आहेत.
पोस्ट कोविड (कोविड झाल्यानंतर) कॉम्प्लिकेशन्स म्हणजे काय?
कोरोना होऊन बरे झाल्यानंतर ४-५ आठवड्यांनी कुठलीही लक्षणे किंवा रोग आढळल्यास त्याला पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स असे म्हणतात. पचनविषयक समस्या, खोकला, पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, नैराश्य, सांधेदुखी, श्वास घेण्यास त्रास, फुफ्फुसांचे आणि न्यूरोलॉजिकल विकार अशी अनेक पोस्ट-कोविड लक्षणं दिसतात. एवढेच नव्हे तर दात, जबडे आणि हाडाच्या विकारांचा देखील यात समावेश आहे. आता कोविड संसर्गाच्या परिणामांबद्दल नवीन अहवाल आणि डेटा प्रकाशात येत आहे. सध्या हा रोग म्यूकोर्मिकोसिसशी जोडला गेला आहे.
म्यूकोर्मिकोसिसशी म्हणजे काय?
म्यूकोर्मिकोसिसशी हे एक गंभीर बुरशीजन्य इन्फेकशन आहे. कोरोना होऊन गेलेल्या अनेक रुग्णांमध्ये म्यूकोर्मिकोसिस आढळत आहे. हा रोग इम्यूनोकॉम्प्रेशन, ऑक्सिजन लेव्हल कमी होणे, दीर्घकाळ हॉस्पिटलायझेशन यासारख्या विविध कारणांमुळे उद्भवते. हे इन्फेक्शन तोंड, नाक आणि घशात उद्भवते आणि नंतर ते डोळे, मेंदू आणि संपूर्ण शरीरात पसरते. त्याव्यतिरिक्त फुफ्फुसं, पोट, किडनीसारख्या इतर अवयवांवर देखील होतो. एकदा मेंदूत याची लागण होण्यास सुरुवात झाली तर ती जीवघेणी बनू शकते. वृद्ध लोक आणि इतर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या लोकांमध्ये हे जास्त आढळते, परंतु अगदी तरूण व निरोगी लोकही संक्रमणाने प्रभावित होऊ शकतात.
म्यूकोर्मिकोसिस कसा होतो?
हा संसर्गजन्य आजार नाही. आपल्या आजूबाजूला असलेली बुरशी आणि त्यांचे स्पोअर्स नाकाद्वारे किंवा एखाद्या जखमेवाटे शरीरामध्ये प्रवेश करू शकतात. जर इम्युनिटी कमी असेल तर ही बुरशी त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये शिरते आणि अवयव निकामी करू लागते.
कोविड-१९ आणि म्यूकोर्मिकोसिस
कोविड-१९ रुग्णांच्या उपचारांच्या प्रक्रियेमध्ये, बऱ्याच वेळा स्टेरॉइड्स आणि इतर औषधे रोगप्रक्रिया किंवा फुफ्फुसांच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांचे जीवन वाचवण्यासाठी वापरल्या जातात. त्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या प्रतिकारशक्तीवर देखील परिणाम होतो. दुर्बल प्रतिरक्षा प्रणाली आणि आजारपणात अशा जीवनरक्षक औषधांचा उपयोगामुळे म्यूकोर्मिकोसिस होण्याची शक्यता वाढवू शकतो.
म्यूकोर्मिकोसिसची लक्षणे कोणती आहेत?
या दुर्मिळ बुरशीजन्य संसगामुळे ग्रस्त रुग्णाला श्वास घ्यायला अडथळा, दात हलणे, जबडा दुखणे, तोंडाची दुगंर्धी, एका बाजूचे नाक गच्च होणे, डोळे सुजणे, डोळ्यांची मर्यादित हालचाल, घसा खवखवणे, घसा दुखणे आणि सूजलेल्या भागावर काळे डाग पडणे, अशी लक्षणे दिसतात. कधी कधी ताप, पोटामध्ये दुखणे, रक्तासह किंवा काळसर उलटी होणे, पोट फुगणे असे देखील लक्षणे दिसतात. एकदा ही लक्षणे निदर्शनात आल्यावर त्वरित वैद्यकीय मदत घेणे फार महत्वाचे आहे.
म्यूकोर्मिकोसिसचा उपचार कसा केला जातो?
या रोगाचे निदान सीटी किंवा सीबीसीटी स्कॅन आणि एंडोस्कोपीच्या सहाय्याने केले जाऊ शकते. एकदा संसर्ग आढळल्यास रुग्णाला अँटीफंगल थेरपी दिली जाते. जर संसगार्मुळे आपल्या अवयवांवर त्रास होत असेल तर रुग्णाला सर्जरी करावी लागते. रुग्णांनी लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये आणि उपचारांना उशीर करू नये. या आजारामध्ये ४०% पेक्षा जास्त एवढा मृत्यूचा धोका आहे. तसेच बाधित भाग काढून टाकणे आवश्यक असल्याने शारीरिक व्यंगासह जगावे लागू शकते .
म्यूकोर्मिकोसिस कसे टाळावे?
नियमित मास्क घालणे, नियमितपणे हात धुणे, नाक स्वच्छ ठेवणे, डोळ्यांची चाचणी करणे. कुठल्याही दमट, अस्वच्छ ठिकाणी जाणे टाळावे, शिळे अन्न खाणे टाळावे, आपला परिसर, घर, किचन व फ्रिज स्वच्छ ठेवावे . कुठेही बुरशी येणार नाही याची काळजी घ्या. बुरशीचे बीजकण धूळ-माती मध्ये असू शकतात त्यामुळे धुळीच्या ठिकाणी जाणे. या काळामध्ये शरीरावर काही जखमा झाल्या तर त्यांची योग्य काळजी घ्या.
पोस्ट कोविड काळजी
कोविडनंतरच्या आरोग्याकडे रुग्णांनी दुर्लक्ष करू नये. डॉक्टरांकडे नियमितपणे जावे आणि निरोगी राहण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करणे फार महत्वाचे आहे. ज्या रुग्णांना अनियंत्रित मधुमेह आहे अथवा इम्युनिटी कमी होण्याची इतर काही कारणे आहेत त्यांनी अतिशय जास्त काळजी घेणे आवश्यक आहे .
>> श्वासाचे व्यायाम-कोविड इन्फेक्शननंतरही दीर्घ श्वासोच्छवास सुरू ठेवणे फारच महत्वाचे आहे. यामुळे ऑक्सिजन संपृक्तता वाढते, रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते आणि सायनस निरोगी ठेवण्यास मदत होते.>> योग्य औषधे- त्याचप्रमाणे, वय आणि इतर गोष्टी जसे की आजारांचे विचारात घेतली पाहिजे आणि डॉक्टरांनी लिहून दिलेली योग्य औषधे नियमित घ्यावीत.>> संतुलित आहार- आवश्यक पोषक तत्त्वांनी भरलेला आहार घेणे आवश्यक आहे.ताजी फळे, भाज्या, मसूर, बियाणे आणि डाळींचा आहारात समावेश करून एक मजबूत रोगप्रतिकार प्रणाली तयार करा. तसेच प्रथिनेयुक्त आहार फुफ्फुसांच्या खराब झालेल्या ऊतींच्या दुरुस्तीस मदत करू शकतो. >> भरपूर प्रमाणात द्रव घ्या आणि भरपूर पाणी प्यावे.>> धूम्रपान, मद्यपान, तंबाखू चर्वण करणे, यासारख्या व्यसनाधीन सवयी सोडणे >> पुरेसे विश्रांती, नियमित योग किंवा ध्यान आवश्यक आहे. >> त्याव्यतिरिक्त नियमित मास्क घालणे, सोशल डिस्टंसिन्ग पाळणे, नियमित हात धुणे, इ. गोष्टींचे पालन करावे.
सर्वात महत्त्वाची आणि गंभीर गोष्ट अशी आहे की कोणतीही लक्षणे जसे दात दुखणे, डोके दुखणे, वारंवार सर्दी होणे इत्यादी, यांना दुर्लक्षित करू नये. या लक्षणांबद्दल त्वरित डॉक्टरांना सांगा.जागरूक राहा. कारण कोविड विरुद्ध युद्ध नुकतेच सुरू झाले आहे! निरोगी रहा सुरक्षित राहा!
(लेखिका ओरल फिजिशियन व ओरल रेडिओलॉजिस्ट आहेत)संपर्कः ९०११६०११७७