मुंबई - दात पडला किंवा काढावा लागला तर, त्या जागी सोन्याचा म्हणजेच ‘गोल्ड अलाईव्ह’ दात बसविण्याची क्रेज होती. मात्र, आता ही क्रेझ कमी झाली असून, खऱ्या दातांसारखेच दात बसविण्याकडे लोकांचा कल आहे. म्हणूनच सर्वांना परवडणारे, असे फोर्सिलीन फ्युज्ड मेटल (पीएसएम) दात खऱ्या दातांसारखेच दिसत असल्याने रुग्णांकडून त्याची मागणी वाढल्याचे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.
सोन्याचा दात नकोच
दिसायला सोन्याचा असला, तरी विविध धातूंचे मिश्रण असलेली ही एक दातावरील कॅप असते. यामध्ये सोने, तांबे, कोबाल्ट अशा धातूंचे मिश्रण असते. हा दात बसविण्याला फारशी मागणी नाही.
सोन्यापेक्षा सिरॅमिकचा दात मोलाचा
सोन्याचा म्हणजेच गोल्ड अलाईव्ह या दातासाठी साधारणत: तीन ते पाच हजारांपर्यंत खर्च येतो. मात्र, ऑल सिरॅमिक या दातासाठी सहा ते सात हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. हा दात महागडा असला, तरी तो हुबेहूब खऱ्या दातासारखा आणि मजबूत असल्याचे डॉक्टर सांगतात.
काय आहे ‘पीएसएम’?
कृत्रिम दातांमध्ये पीएसएम म्हणजेच फोर्सिलीन फ्युज्ड मेटलला जास्त मागणी असल्याचे दिसून येते. पीएसएम प्रकारचे दात हे सिरॅमिक आणि मेटलचे कॉम्बिनेशन असते. हा दात दिसायला खऱ्या दातांसारखाच असून, सर्वसामान्यांना परवडणारा देखील आहे.
दातासंबंधीच्या समस्या घेऊन अनेक रुग्ण येतात. कीड लागल्यामुळे दात पडला किंवा काढावा लागला तर हुबेहूब दिसणाऱ्या ऑल सिरॅमिक या प्रकारातील दातांना मागणी आहे. - डॉ. प्रबोध वानखडे, दंतरोग तज्ज्ञ, वाशिम
गत काही वर्षांपूर्वी सोन्याचे दात बसविण्याची क्रेझ होती. आता खऱ्या दातांसारखेच व मजबुती असलेल्या फोर्सिलीन फ्युज्ड मेटल किंवा प्यूअर सिरॅमिक या प्रकारचे दात योग्य ठरतात. - डॉ. रोशन बंग, दंतरोग तज्ज्ञ, वाशिम