असं म्हणतात पाणी हे जीवन आहे. उन्हाळ्यात तर आपल्या शरीरात पाण्याची कमतरता खूप जाणवते. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी नियमित आणि पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. पाणी प्यायल्याने आपण अनेक आजारांपासून दूर राहतो. आपल्या शरीरात सुमारे ६० टक्के पाणी असते. शरीरामध्ये लाळ निर्मिती, पचन, शोषण, रक्ताभिसरण, पोषक तत्त्वांचे परिवहन, शरीरातील तापमानाचे व्यवस्थापन, चयापचयातील विषारी पदार्थाचे विसर्जन आदी क्रिया होण्यासाठी पाणी अत्यावश्यक असते.
पायनॅकल केयर या वेबसाईटला डॉ. आशिष सचदेवा यांनी दिलेल्या माहितीनुसार रोज सकाळी झोपेतून उठल्यावर उपाशीपोटी पाणी प्यावं. यामुळे बरेच फायदे होतात. पहिला फायदा म्हणजे शरीरातील सर्व विषारी पदार्थ सहजपणे बाहेर पडतात. तसेच शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण होते. याचा थेट परिणाम तुमच्या चेहऱ्यावर होतो. तुमच्या चेहरा चमकदार होतो. अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो. यावर पाणी पिणं हा चांगला उपाय आहे. सकाळी झोपेतून उठल्यावर उपाशीपोटी तीन ग्लास पाणी प्यावं. जर तुम्ही शरीराचं वजन वाढत असल्याने चिंतेत असाल तर दररोज रोज सकाळी उठल्यावर पाणी प्या.
यामुळे तुमच्या मेटाबॉलिज्ममध्ये देखील सुधारणा होईल. त्यामुळे तुमचं वजनही नक्कीच कमी होण्यास मदत होईल. दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्या. यामुळे पचनक्रियी तर सुधारेलच पण वजनही कमी होते. तसेच त्वचेची समस्याही दूर होते. आंघोळ करण्यापूर्वी अर्धा तास आधी एक ग्लास पाणी पिण्यामुळे रक्तसंचारण सुधारते आणि रक्तदाब कमी होण्यास मदत होते. यामुळे आपल्या शरीरात उर्जा टिकून राहते. दररोज झोपण्याच्या आधी अर्धा ग्लास पाणी प्यावे. अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की, यामुळे हृदयविकाराचा धोका बर्याच प्रमाणात कमी होतो.
पाणी प्यायल्याने ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात शरीरात पोहोचतो आणि रक्ताभिसरण चांगले होते. नेहमीच बसून पाणी प्यावे. उभे राहून पाणी पिण्याणे गुडघे दुखीची समस्या निर्माण होऊ शकते. याशिवाय बाटली किंवा कोणत्याही भांड्याद्वारे वरून पाणी पिण्याऐवजी ते एखाद्या ग्लासात ओतून, व्यवस्थित तोंड लावून प्यावे. शरीराच्या तापमानापेक्षा पाण्याचे तापमान कमी असू नये. उन्हाळ्यात लोक घरात पाय टाकतातच थंडगार पाणी पितात. ज्यामुळे शरीराची मोठ्या प्रमाणात हानी होते.