उन्हाळा (Summer) सुरू झाला आहे. कमाल तापमानात वाढ झाल्याने मार्च महिन्यातच उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उसाचा रस, सरबत, ज्यूस आदी थंड पेयांना मागणी वाढली आहे. बहुतांश जण या दिवसांत प्राधान्यानं फ्रीजमधलं थंड पाणी (Cold Water) पितात; पण थंड पाणी पिणं शरीरासाठी अपायकारक मानलं जातं. फ्रीजमधलं थंड पाणी प्यायल्यानं आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे घरातली मोठी माणसं फ्रीजऐवजी साधं किंवा माठातलं पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. परंतु, काही जण याकडे दुर्लक्ष करून फ्रीजमधलं पाणी पितात.
थंड पाणी प्यायल्यानं पचनाशी संबधित आजार होऊ शकतात. तसंच डोकेदुखी, हार्ट रेट वाढणं यांसारख्या आरोग्यविषयक समस्या जाणवू शकतात. एकूणच थंड पाणी पिणं हे आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतं. 'झी न्यूज हिंदी' ने याबाबतची माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
उन्हाळ्यात थंड पाणी पिणं आरोग्यासाठी (Health) अपायकारक मानलं जातं; मात्र काही जण याकडे दुर्लक्ष करून फ्रीजमधलं थंड पाणी पितात. थंड पाणी प्यायल्यामुळे काही जणांना डोकेदुखीचा (Headache) त्रास जाणवू लागतो. उदाहरणार्थ, बर्फाचा खडा गिळताना अनेकांना कपाळावरच्या भागात वेदना होत असल्याचं तुम्ही ऐकलं, पाहिलं असेल. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही थंड पाणी पिता, तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या डोक्यावर जाणवतो. त्यामुळे काही जणांना डोकेदुखीचा त्रास सुरू होतो.
हे पाणी संवेदनशील मज्जातंतूंना थंड करतं आणि तुमच्या मेंदूला संदेश पाठवतं. त्यामुळे डोकेदुखीचा त्रास जाणवू लागतो. थंड पाणी प्यायल्यामुळे बद्धकोष्ठता (Constipation) होऊ शकते. एका संशोधनानुसार, जेवल्यावर थंड पाणी प्यायलं तर अन्न पचणं कठीण होतं. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
`टाइम्स नाऊ`च्या एका वृत्तानुसार, थंड पाणी प्यायल्यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. थंड पाण्यामुळे पचन संस्थेवर परिणाम होतो. जेव्हा तुम्ही तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुता, तेव्हा त्वचेची छिद्र मोकळी होतात आणि त्वचा सैल होते. दुसरीकडे जेव्हा तुम्ही तुमचा चेहरा थंड पाण्याने धुता तेव्हा तुमची त्वचा घट्ट होते. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही थंड पाणी पिता तेव्हा असाच काहीसा परिणाम तुमच्या पोटावर होऊन समस्या निर्माण होऊ शकते.
एका वैद्यकीय संशोधनानुसार, थंड पाणी प्यायल्यामुळे तुमचा हार्ट रेट (Heart Rate) अर्थात हृदयाचे ठोके कमी होऊ शकतात. थंड पाणी पिणं हे हृदयाच्या आरोग्यासाठी हितावह नसतं, असं तैवानमधल्या एका संशोधनातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे थंड पाणी कमीत कमी पिण्याचा किंवा न पिण्याचा प्रयत्न करा. अन्यथा तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.