मुंबई : स्तनाच्या कर्करोगाविषयी टाटा रुग्णालयाने महत्त्वाचे संशोधन केले आहे. या अभ्यास संशोधन अहवालानुसार, स्तनाच्या कर्करोगाचा औषधोपचार काळ आता केवळ तीन महिन्यांचा असेल. परिणामी, उपचारांचा ९ महिन्यांचा कालावधी कमी होईल. औषधोपचारांसाठी येणारा खर्चही कमी होऊन त्यात दोनतृतीयांश घट होऊ शकते, असे अहवालात नमूद आहे.
टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे आणि टाटा मेमोरिअलचे डॉ. सुदीप गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली संशोधनाअंती हा अभ्यास अहवाल तयार करण्यात आला. यासाठी डॉ. सीमा गुल्ला आणि साधना कनन यांनीही साहाय्य केले. टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे म्हणाले, १२ महिन्यांच्या कालावधीप्रमाणे दोन ते तीन महिन्यांत त्याच दर्जाचे उपचार देणे शक्य आहे. भारतीय महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग सामान्यत: आढळून येतो. त्यातील एचईआर - २ पॉझिटिव्ह स्तनाच्या कर्करोगात अँटिबॉडी निर्मितीसाठी ट्राटुझुमॅब हे औषध साहाय्यक उपचार पद्धत म्हणून १२ महिन्यांच्या कालावधीसाठी देण्यात येते. या कर्करोगाचे प्रमाण सुमारे २५% आहे.डॉ. सुदीप गुप्ता म्हणाले, जागतिक पातळीवर सहा अभ्यासांतील ११ हजार रुग्णांवर ही उपचार पद्धती अवलंबिण्यात आली. त्या माध्यमातून अनेक रुग्ण बरे झाले. त्यातील अनेकांना हृदयविकाराशी संबंधित आजार उद्भवलेला नाही. जागतिक पातळीवर औषधाची परिणामकारकता सिद्ध झाल्यास त्याच्या किमतीवर नियंत्रण ठेवणे सुकर होईल. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत या औषधोपचार पद्धतीचा विचारही केला जाऊ शकतो.भारतीय महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणदेशात हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू आणि दिल्लीत स्तनाच्या कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण आहे. स्तनाच्या कर्करोग रुग्णांची संख्या २ लाखांवर जाण्याची शक्यता असून, सध्या हे प्रमाण १४.८ टक्के एवढे आहे. दरवर्षी देशात दीड लाखाहून अधिक स्तनाच्या कर्करुग्णांचे निदान होते. त्यातील सुमारे ४५ हजार रुग्णांना औषधोपचारांचा लाभ मिळतो.