(Image Creadit : shutterstock.com)
एकटेपणामुळे व्यक्ती मानसिकरित्या खचून जातोच परंतु, यामुळे आपल्या आरोग्यावरही विपरित परिणाम होतात. काही वेळासाठी एकांतात राहणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं, परंतु जर एखादी व्यक्ती सतत एकटी राहत असेल तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरतं. असं साऊथ कोरियामध्ये झालेल्या संशोधनातून सिद्ध झालं आहे. संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, एकटं जेवणं हे आरोग्यासाठी घातक ठरतं. याचा परिणाम महिलांपेक्षा पुरूषांच्या आरोग्यावर जास्त होतो.
संशोधनातून सिद्ध झालं आहे की, एकटं जेवणाऱ्या पुरूषांमध्ये महिलांपेक्षा जास्त गंभीर आजार आढळून आले आहेत आणि त्याचप्रमाणे ते लठ्ठपणासारख्या इतर आजारांनीही त्रस्त आहेत. एकट्याने जेवल्याने हाय ब्लडप्रेशर आणि हाय कोलेस्ट्रॉलसोबतच मेटाबॉलिक सिंड्रोम वाढण्यासही मदत होते. संशोधकांनी पुरूष आणि महिलांमधील एकांत आणि आरोग्य यांच्यातील संबंधांचा अभ्यास केला.
दक्षिण कोरियातील सोलमधील डांगगुक विश्वविद्यालय आणि इल्सान हॉस्पिटलमधील जवळपास 8 हजार व्यक्तींवर अभ्यास करण्यात आला. त्यांना विचारण्यात आलं की, ते दिवसातून केव्हा आणि किती वेळा एकटे जेवतात. हे संशोधन लठ्ठपणा आणि एकटेपणा यांच्यातील संबंधांवर आधारित आहे. संशोधनातून असं सिद्ध झालं की, एकटं जेवणाऱ्या 45 टक्के पुरूषांमध्ये लठ्ठपणा वाढलेला आहे, तर 64 टक्के लोकांमध्ये मेटाबॉलिक सिंड्रोम वाढलेलं आढळून आलं आहे. महिलांबाबत बोलायचं झालं तर एकटं जेवणाऱ्या महिलांमध्ये फक्त 29 टक्के महिलांमध्येच मेटाबॉलिक सिंड्रोमची समस्या आढळून आली आहे.
अमेरिकेमध्ये करण्यात आलेल्या जनगणनेनुसार, 2013नंतर 27 टक्यांपेक्षा अधिक जनसंख्या एकटी राहते. अमेरिकेमध्ये 15 टक्के महिला एकट्या रहातात. परंतु पुरूषांमध्ये एकटेपणाचे साइडइफेक्ट्स जास्त आडळून येतात. ब्रिघम यंग यूनिवर्सिटीच्या संशोधकांचं असं मत आहे की, एकटं राहणाऱ्या पुरूषांमध्ये मृत्यूचा धोका 45 टक्क्यांनी वाढतो. एकटं राहणारी लोकं स्वतःला समाजापासून दूर राहतात. अमेरिकेमध्ये 1920पासून हा धोका वाढतच आहे.