‘अॅन अॅपल इन ए डे, कीप्स डॉक्टर अवे’ अशी इंग्रजीत म्हण आहे. सफरचंद कुणाला आवडत नाही? जगभरात हे फळ आवडीने खाल्ले जाते. फळाचा गर खाताना, काही जणांना त्याच्या काळ्या बिया कुरतडून खायची सवय असते, पण त्याच्या या कडू लागणाऱ्या बियामध्ये एक कटू वास्तव्य आहे व ते आता वैज्ञानिकांना कळून आले आहे. त्या बियामध्ये अॅमिग्दालीन नावाचे एक वनस्पती रसायन असते. सफरचंद, जर्दाळू, बदाम, पीच व चेरी ही वनस्पतीच्या ‘रोझ फॅमिली’तील फळे आहेत आणि त्यांच्या बियांत हे रसायन सर्रास आढळते.वास्तविक, अॅमिग्दालीन हे रसायन हे या वनस्पतीच्या संरक्षण यंत्रणेचा भाग असतो. तसे ते रसायन निरुपद्रवी असते, पण जेव्हा बिया चिरडल्या जातात, चघळल्या जातात, कुरतडल्या जातात, तेव्हा त्या रसायनाचे विघटन होते व त्याचे हायड्रोजन सायनाइड या विषारी रसायनात रूपांतर होते. सायनाइड हे रसायन विषारी असल्याचे जगजाहीर आहे. हे रसायन शरीरपेशींना होणाºया आॅक्सिजनच्या पुरवठयात अडथळा आणते व ते मोठ्या प्रमाणात शरीरात जीवघेणे ठरते. जरी फळाच्या बियातील हे रसायन अल्प प्रमाणात असले, तरी ते मोठ्या प्रमाणात शरीराला घातक ठरू शकते, तेव्हा अख्खे सफरचंद खाताना सावधान असावे. मुलांना या फळांच्या बिया काढून, फोडी करून खायला द्यावीत, असे तज्ज्ञ सल्ला देत आहेत.आपल्या शरीराची संरक्षणयंत्रणा इतकी कार्यक्षम असते की, शरीरात कळत-नकळत अल्प प्रमाणात घुसणाºया अपायकरक पदार्थांना ती जेरबंद करत असते. विशेषत: तोंडातून शरीरात जाणाºया अशा अपायकारक अन्नाचा ती बंदोबस्त करत राहते, परंतु त्यांचे प्रमाण वाढीव असले की, मात्र शरीर व्याधीचे बळी ठरते. अर्थात, विषारी रसायने इंजेक्शनद्वारा अल्प प्रमाणातसुद्धा सरळ रक्तात घुसतात, तेव्हा त्यांचा परिणाम तत्काळ दिसून येतो.- जोसेफ तुस्कानो(लेखक ज्येष्ठ विज्ञानलेखक वपर्यावरण अभ्यासक आहेत.)
सफरचंद खाताय? सावधान! ही काळजी घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 3:29 AM