मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याकडे रुग्णांना आकडी येते, काही काळात रुग्ण बरा होतो. मात्र त्या रुग्णांचे आपल्याकडे व्यवस्थित निदान केले जात नाही. त्यामुळे त्यांना वर्षातून काही वेळा आकडी येत असते, मात्र अशा रुग्णांची मेंदूविकार तज्ज्ञांकडून तपासणी करण्याचे गरजचे असते. कारण या अशा रुग्णांना एपिलेप्सी नावाचा आजार असू शकतो. या आजाराचे प्रमाण राज्यातील लोकसंख्येच्या एक टक्का असल्याचे सांगण्यात येते. या आजाराबाबत फारशी माहिती आणि जनजागृती नसल्याने अनेक रुग्णांना या आजाराचे निदान मिळत नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
अचानक येतो झटकाएपिलेप्सी आजारात फिट येणे किंवा आकडी किंवा मिरगी अशी लक्षणे आढळून येतात त्याला अपस्मार नावाने संबोधतात. या आजारामध्ये रुग्णाला कोणतीही पूर्वकल्पना न येता झटका येतो. अनेकवेळा त्या रुग्णाची शुद्ध हरपते, दातखिळी बसते. त्यावेळी रुग्ण त्या ठिकाणी खाली जमिनीवर कोसळतो. त्यावेळी आजूबाजूच्या लोकांना काय करावे, हे पटकन उमजत नाही. यामध्ये काही काळानंतर रुग्ण पुन्हा स्वतःहून स्थिर स्थावर होतो. मात्र जेव्हा हा झटका येतो त्यावेळी त्याला काहीही कळत नाही.
औधषोपचारासह शस्त्रक्रियेचा पर्यायशहरात या आजारावर उपाय केले जातात. विशेष म्हणजे हा आजार लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणत्याही वयोगटात होऊ शकतो. या आजारावर उपाय करण्यासाठी मेंदूविकार तज्ज्ञांची गरज असते. त्यामध्ये हे तज्ज्ञ ई ई जी (इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम) चाचणी, एम आर आय तसेच कुटुंबातील कोणत्या सदस्याला हा आजार आहे का ? हे पाहून या आजाराचे निदान करत असतात. निदान केल्यानंतर हा आजार बरा करण्यासाठी रुग्णाला ४-५ वर्षे औषधे घ्यावी लागतात. औषधाने हा आजार बरा झाला नाहीतर शस्त्रक्रिया केली जाते.
काय असतात कारणे काही प्रमाणात हा आजार आनुवंशिक असतो मेंदूमध्ये गाठ येणे मेंदूला इजा होणे मेंदूला संसर्ग होणे जन्मावेळी श्वास मेंदूला न मिळणे
हे करू नये ? या अशा पद्धतीचे रुग्ण पाहिल्यावर अनेकवेळा चप्पल आणि कांदा तोंड नाकावर लावला जातो. तोंडावर सोडा किंवा पाणी मारले जाते तोंडात चमचा किंवा तत्सम धातुयुक्त पदार्थ घुसविला जातो.
ग्रामीण भागात अनेक रुग्णांना या आजाराची माहिती नाही. या आजाराचे निदान करणे सोपे आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवणेसुद्धा सोपे आहे. या आजारात त्या व्यक्तीला कुठेही फिट्स येऊ शकते. त्यामुळे या आजाराचे एकदा निदान झाल्यानंतर अशा रुग्णांनी ड्रायव्हिंग, स्वामिंग करणे टाळणे गरजेचे आहे. - डॉ. निर्मल सूर्या, अध्यक्ष, इंडियन फाउंडेशन ऑफ न्यूरोरिहॅबिलिटेशन