(Image Credit : foodnavigator.com)
अलिकडे साखरेच्या वेगवेगळ्या पदार्थांमधून केल्या जाणाऱ्या अधिक सेवनामुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. सॉफ्ट ड्रिंक्समधूनही सारख मोठ्या प्रमाणात शरीरात जाते आणि वजन वाढण्यासारखी समस्या होते. अशात अनेकजण शुगर फ्री सॉफ्ट ड्रिंक्सला सुरक्षित मानतात आणि सेवन करतात. पण शुगर फ्री सॉफ्ट ड्रिंक्सला सुरक्षित समजणं चुकीचं ठरू शकतं. कारण एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, शुगर फ्री सॉफ्ट ड्रिंक्स सुद्धा अकाली निधनाचं कारण ठरू शकतात. हा रिसर्च JAMA Internal Medicine नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
१० युरोपीय देशातील साधारण साडे चार लाख लोकांवर हा रिसर्च करण्यात आला. या रिसर्चमधून असं आढळलं की, जे लोक शुगर फ्री किंवा शुगर असलेले ड्रिंक्सचे रोज दोन ग्लास किंवा त्यापेक्षा जास्त सेवन करत असतील तर त्यांना अकाली निधनाचा धोका अधिक राहतो. जे लोक दर महिन्यात एक ग्लासापेक्षा सॉफ्ट ड्रिंक्स सेवन करतात त्यांना हा धोका कमी असतो.
(Image Credit : imperial.ac.uk)
तसेच या रिसर्चमधून समोर आले की, शुगर फ्री सॉफ्ट ड्रिंक्सचं सेवन केल्याने हृदयासंबंधी आजाराने आणि स्ट्रोकनेही मृत्यू होऊ शकतो. तर शुगर असलेल्या ड्रिंक्सचं सेवन करून पचनासंबंधी रोगांमुळे मृत्यू होऊ शकतो. इंपेरिअल कॉलेज लंडनचे जोनाथन पीयर्सन यांनी सांगितले की, 'या रिसर्चमधून हे स्पष्ट होतं की, सॉफ्ट ड्रिंक्स आणि मृत्युचे सामान्य कारण जसे की, हृदयरोग आणि स्ट्रोकचा एकमेकांमध्ये संबंध आहे'.
दरम्यान, सॉफ्ट ड्रिंक्सच्या सेवनामुळे लवकर मृत्यू होण्याचा संबंध रिसर्चमधून समोर आला आहे. पण अभ्यासकांचं असं मत आहे की, हे पूर्णपणे बरोबर असू शकत नाही. रिसर्च करणारे एक अभ्यासक नील मर्फी यांनी सांगितले की, 'आम्हाला आढळलं की, सॉफ्ट ड्रिंक्सचं सेवन कमी करणाऱ्यांच्या तुलनेत जास्त सेवन करणाऱ्यांना मृत्युचा धोका अधिक राहतो. पण याचा हा होत नाही की, केवळ सॉफ्ट ड्रिंक्सच लवकर मृत्युचं कारण असावं. याची आणखीही काही वेगळी कारणे असू शकतात'.