भारतात दरवर्षी येणारा हंगामी आजार म्हणजे, डेंग्यू. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दरवर्षी हा आजार आपल्या विळख्यात अनेक लोकांना अडकवतो. साधारणतः पावसाळ्यात डोकं वर काढणाऱ्या या आजाराने अनेक लोक ग्रस्त असतात. सध्या उत्तर भारतातही हा आजार थैमान घालत आहे. काही दिवसांपूर्वी पाटणामध्ये पुरस्थिती उद्भवली होती. पूर ओसरल्यानंतर तिथे अनेक आजारांनी धुमाकूळ घातला असून त्यातील एक आजार म्हणजे डेंग्यू.
पावसाळ्यात अनेक आजार बळावण्याचा धोका वाढतो. एवढचं नाही तर, पावसाळा म्हणजे, अनेक किटकांसोबतच डासांच्या प्रजननाचा काळ असतो. या वातावरणामध्ये डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. सध्या देशभरात डेंग्यूच्या आजाराने थैमान घातलं असून अनेक रूग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणं आढळून येत आहेत. पण जर योग्य काळजी घेतली तर डेंग्यूपासून बचाव करणं शक्य होतं.
डेंग्यू हा उष्ण कटिबंधीय आजार असून तो मुख्यतः चार विषाणूंमुळे होतो. एडिस इजिप्ती या जातीच्या डासांमधून पसरणाऱ्या या आजाराची ताप, डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी तसंच त्वचेवर चट्टे उठणं ही प्राथमिक लक्षणं असतात. डेंग्यूसाठी सध्यातरी कोणतीही लस उपलब्ध नसली, तरी स्वच्छता राखून, डासांची पैदास रोखून हा आजार थोपवता येतो.
डेंग्यूची लक्षणं : डोकेदुखी, डोळे सतत दुखणं, सर्दी, उल्टी, ग्रंथींना सूज येणं, हाडं आणि स्नायूंमध्ये तीव्र वेदना होणं, अंगावर तसेच त्वचेवर लाल चट्टे उठणं.
डेंग्यूपासून दूर राहण्यासाठी आधीच काही उपाय करणं फायदेशीर ठरतं. जाणून घेऊया डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी काय करावं आणि काय करू नये त्याबाबत...
हे करा?
- मॉस्किटो रिपेलन्टचा वापर करा. यासाठी अनेक स्प्रे आणि क्रिम्स बाजारात उपलब्ध आहेत.
- हात आणि पाय पूर्ण झाकले जातील असे कपडे परिधान करा.
- घराच्या खिडक्यांना जाळी लावा आणि घराचा दरवाजा कामाशिवाय उघडा ठेवू नका
- झोपताना मच्छरदानीचा वापर करा आणि डासांना दूर ठेवणारी कॉइलही लावा.
- ताप येत असेल तर लगेचंच डॉक्टरांचा सल्ला घ्या, अजिबात दुर्लक्षं करू नका.
- डाएटवर लक्ष द्या, त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
हे करणं टाळा?
- पाणी साचून राहिल अशी कोणतीही वस्तू घराच्या आजूबाजूच्या परिसरात ठेवू नका.
- एखाद्या ठिकाणी खूप दिवसांपासून पाणी साचून राहिलं असेल तर त्या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी पाठवू नका.
- डेंग्यूने पीडित कोणत्याही व्यक्तीला भेटण्यासाठी गेलात तर मास्कचा वापर करा. तसेच त्या व्यक्तीला स्पर्श करू नका.
- घरामध्ये कूलर असेल तर तो स्वच्छ केल्याशिवाय त्यामध्ये अजिबात पाणी टाकू नका. आधी कूलर व्यवस्थित स्वच्छ करा आणि त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ पाणी टाका.
- एखाद्या परिसरात किंवा शहरात डेंग्यूचे रूग्ण आढळून आले असतील किंवा डेंग्यूची साथ आली असेल तर तिथे जाणं टाळा.