डॉ. निशा कैमल, कन्सल्टन्ट, एंडोक्रिनॉलॉजी व डायबेटॉलॉजी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल
Diabetes : डायबिटीस मेलिटस हा आजार रक्तामध्ये शर्करेचे प्रमाण वाढण्याशी संबंधित आहे. जेव्हा स्वादुपिंडातील इन्शुलिन तयार करणाऱ्या पेशी रोगप्रतिकारक यंत्रणेमार्फत नष्ट केल्या जातात आणि स्वादुपिंडामध्ये इन्शुलिनची निर्मिती अगदी कमी होते किंवा अजिबात होत नाही तेव्हा टाईप १ मधुमेह होतो. या आजारावर फक्त इन्शुलिनच्या इंजेक्शनमार्फतच उपचार केले जाऊ शकतात. मधुमेह मेलिटस असलेल्या ९०% लोकांना मात्र टाईप २ मधुमेह असतो. या प्रकारामध्ये स्वादुपिंडामध्ये इन्शुलिनची निर्मिती होते पण शरीर इन्शुलिनमार्फत कोणतीही क्रिया घडून येण्यास विरोध करते आणि त्यामुळे शर्करेचे प्रमाण वाढते.
मधुमेह असलेल्या बहुतांश लोकांमध्ये या आजाराची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. पण ज्यांच्या बाबतीत लक्षणे आढळून येतात त्या व्यक्तींना जास्त तहान लागणे, सतत लघवीला होणे, भूक वाढणे, वजन कमी होणे, अशक्तपणा, कोणतीही जखम बरी होण्यास वेळ लागणे, अस्पष्ट दृष्टी, पाय दुखणे किंवा सुन्न होणे किंवा त्वचा कोरडी होणे, त्वचेला खाज सुटणे अशा तक्रारी असतात.
१४ नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिवस असून यंदाच्या वर्षीची संकल्पना 'ऍक्सेस टू डायबिटीस केयर' अर्थात 'मधुमेहामध्ये काळजी घेण्याच्या सेवासुविधांची उपलब्धता' ही आहे.
२०१९ साली मधुमेह असलेल्या जगभरातील प्रौढ व्यक्तींची संख्या जवळपास ४६३० लाख होती. भारतात तब्बल ७७० लाख लोक मधुमेहाने ग्रस्त असून जगभरात सर्वाधिक मधुमेहींच्या यादीत चीननंतर दुसरा क्रमांक भारताचा आहे. मधुमेह असलेल्या दर पाचपैकी चार लोक गरीब किंवा विकसनशील देशांमध्ये राहतात. रक्तातील शर्करेचे प्रमाण मोजण्याचे उपकरण, तोंडावाटे घ्यावयाची औषधे इतकेच नव्हे तर पोषक अन्न देखील अनेक मधुमेहींना उपलब्ध होत नाही किंवा परवडत नाही. इन्शुलिनचा शोध शंभर वर्षांपूर्वी १९२१ साली लावण्यात आला होता, जो सर्वात महान वैद्यकीय शोधांपैकी एक मानला जातो आणि त्यामुळे आजवर लाखो लोकांचे जीव वाचवण्यात यश मिळाले आहे. टाईप १ मधुमेह असलेल्या लोकांसाठी इन्शुलिन हा एकमेव प्रभावी उपचार आहे. इन्शुलिनचा शोध लावला जाण्याआधी टाईप १ मधुमेह असलेल्या व्यक्ती आजार सुरु झाल्यापासून फक्त एक ते दोन वर्षेच जगू शकत होत्या. पण दुर्दैवाची बाब अशी की, आजही जगभरातील लाखो लोकांना इन्शुलिन उपलब्ध होऊ शकत नाही.
टाईप २ मधुमेहावरील उपचारांमध्ये वजन कमी करणे, निरोगी खाणे आणि व्यायाम हे सर्वात महत्वाचे घटक आहेत. पाच ते दहा टक्के वजन कमी झाल्यामुळे रक्तातील शर्करेच्या पातळीत लक्षणीय सुधारणा होते. रुग्ण व्यक्तीने आपल्या आहारात कॅलरीज कमी, साखर संतुलित प्रमाणात आणि सॅच्युरेटेड फॅट्स कमी असतील याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे रिफाईंड कार्बोहायड्रेट्स, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ टाळून खूप जास्त फायबर व भाज्या खाल्ल्या पाहिजेत.
मधुमेह असलेल्या लोकांनी दररोज किमान तीस मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम करण्याची शिफारस केली जाते. ज्या व्यक्ती घराबाहेर जाऊन व्यायाम करू शकत नाहीत अशांसाठी, स्ट्रेचिंग व्यायाम, परवानगीनुसार वजन उचलण्याचे व्यायाम, योगा, चालणे, घरामध्ये जॉगिंग आणि व्यायाम मशिन्सचा वापर हे पर्याय आहेत. दिवसभरातील एकूण बैठा वेळ कमी करण्यासाठी घरातील छोटी-मोठी कामे करत शारीरिक हालचाली वाढवल्या पाहिजेत. साधारण ३ ते १५ मिनिटांच्या थोड्याशा शारीरिक हालचालींमुळे जेवणानंतरचा हायपरग्लाइसेमिया कमी होण्यात मदत होते.
मधुमेहाच्या बाबतीत एक गैरसमज असतो की हा काही गंभीर आजार नाही. पण ध्यानात ठेवा की असे मानणे चुकीचे आहे. मधुमेह असलेल्या लोकांमध्ये एन्जाईना (हृदयविकाराचा झटका येण्याआधी छातीत दुखणे), हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, हृदय निकामी होणे आणि परिधीय धमनी रोग (पायांमधील रक्तवाहिन्यांवर परिणाम करणारा रोग) यांसारख्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विकारांची गुंतागुंत होण्याची शक्यता दुप्पट असते. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी करण्यासाठी रक्तातील शर्करेचे प्रमाण आणि रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल सारखे इतर, धोकादायक ठरू शकतील असे घटक नियंत्रित प्रमाणात आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे.
आणखी एक खूप मोठा गैरसमज म्हणजे मधुमेह असलेल्या व्यक्ती आंधळ्या होतात आणि त्यांना त्यांचे पाय गमवावे लागतात. पण जर रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात ठेवले, धूम्रपान व हायपरटेन्शन यासारख्या, धोकादायक ठरू शकणाऱ्या इतर घटकांना दूर ठेवले, तर अशी गुंतागुंत टाळता येऊ शकते. मज्जातंतूचे नुकसान (न्यूरोपॅथी), दृष्टीदोष (रेटिनोपॅथी) आणि किडनीचे नुकसान (नेफ्रोपॅथी) यासारख्या मधुमेहामुळे उद्भवणाऱ्या गुंतागुंतीसाठी वर्षातून किमान एकदा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा तपासण्या करणे महत्त्वाचे आहे.
मधुमेह असलेल्या व्यक्तींनी कोविड-१९ लस घेणे आवश्यक आहे. संशोधनातून असे आढळून आले आहे की कोविड १९ संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मधुमेहावर नीट नियंत्रण ठेवले गेलेले नसणे ही बाब आजार अधिक गंभीर होणे किंवा मृत्यू देखील ओढवला जाण्याशी संबंधित होती. आजार होऊ नये म्हणून खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे आणि लसीकरण करणे हा त्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
टाइप २ मधुमेह हा जीवनशैलीमुळे ओढवणारा आजार मानला जातो. तथापि, जीवनशैलीत चांगले बदल घडवून आणल्यास, सकस आहार आणि व्यायामामुळे व्यक्तीच्या तब्येतीवर होणाऱ्या परिणामांमध्ये लक्षणीय फरक पडतो आणि त्या व्यक्तीला चांगले जीवन जगता येते. या वर्षीच्या जागतिक मधुमेह दिनानिमित्त आपण सर्वांनी हे उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेऊन त्यानुसार पावले उचलू या.