Exercise Tips : शरीर निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी डॉक्टर नेहमीच एक्सरसाइज करण्याचा सल्ला देतात. काही लोक नियमित एक्सरसाइज करतात तर काही लोक अजिबातच करत नाही. काही लोकांची एक्सरसाइज वेळ ठरलेली असते. कुणी सकाळी तर कुणी रात्री एक्सरसाइज करतात. पण रात्री झोपण्याआधी एक्सरसाइज करणं योग्य की अयोग्य हे अनेकांना माहीत नसतं. तेच जाणून घेऊया....
झोपण्यापूर्वी एक्सरसाइज
झोपण्यापूर्वी थोडी एक्सरसाइज करणं शरीरासाठी फायदेशीर असतं. पण अनेकांना असं वाटतं की, असं केल्याने झोपेवर नकारात्मक प्रभाव पडतो. पण हा समज चुकीचा आहे. उलट एक्सरसाइज केल्याने मेंदूत कोर्टिसोल या स्ट्रेस हार्मोनचं प्रमाण कमी होतं आणि तुम्हाला चांगली झोप लागते. त्यासोबतच एक्सरसाइज केल्याने शरीरात एड्रेनालाइन आणि नॉनएड्रेनालाइनची निर्मिती होते. ज्यामुळे हृदयाची गती वाढते. याने शरीराला अन्न व्यवस्थित पचवण्यासही मदत मिळते.
एक्सरसाइजसाठी वेळेची निवड
एक्सरसाइज करण्याची योग्य वेळ ही व्यक्तीच्या जीवनशैलीवर अवलंबून असते. पण झोपण्याच्या एक तासापूर्वी एक्सरसाइज करावी. त्यासोबतच याचीही काळजी घ्यावी की, जेवल्यावर लगेच एक्सरसाइज करू नये, आहार पोटात स्थिर होण्यासाठी वेळ द्यावा. असं केल्यास उलटी किंव पोटात दुखण्याची समस्या होऊ शकते. म्हणजे तुमची झोपण्याची वेळ जर १० वाजता असेल तर ९ वाजता एक्सरसाइज पूर्ण करा.
कोणती एक्सरसाइज करावी?
झोपण्यापूर्वी एक्सरसाइजची निवड करण्यासाठी तुम्हाला रात्रीच्या जेवणाचा विचार करावा लागेल. जर तुम्ही जेवणानंतर एक्सरसाइज करणार असाल तर तुम्ही वॉकिंग किंवा हलकी कोणतीही एक्सरसाइज करा. पण या एक्सरसाइज पोटावर फार भार पडू नये किंवा तुम्हाला फार जास्त स्ट्रेच करावं लागू नये. जर तुम्हाला हेवी एक्सरसाइज करायची असेल तर रात्रीच्या जेवणाआधीच करावी.