नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दोन कोटींच्यावर गेली आहे. लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनानंतर रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. देशात ब्लॅक फंगसने थैमान घातले आहे. म्युकोरमायकोसिस शिवाय व्हाईट फंगस, यलो फंगस आणि क्रीम फंगसचा देखील समावेश आहे. काही तज्ज्ञांच्या मते व्हाईट फंगस देखील (White Fungus) धोकादायक आहे. या फंगसचा संसर्ग झाल्यास तो सर्व अवयवांवर परिणाम करू शकतो.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हाईट फंगसला वैद्यकीय भाषेत कँडिडा (Candida) असं म्हणतात. याचा संसर्ग झाल्यास फुफ्फुसांसोबतच रक्त वाहिन्यांवरही (Blood Vessels) परिणाम होतो, हे याचे वैशिष्ट्य म्हणता येईल. रुग्णाच्या रक्तात फंगसचा प्रवेश झाल्यावर त्यास कँडिडीमिया असं म्हणलं जातं आणि येथूनच तो धोकादायक होण्यास सुरुवात होते. एस.एन. मेडिकल कॉलेजमधील डिपार्टमेंट ऑफ मायक्रोबायोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. आरती अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर कॅंडिडीमिया फुफ्फुसांपर्यंत (Lungs) पोहोचला तर त्याला लंग बॉल (Lung Ball) असं म्हणलं जातं.
सीटी स्कॅनद्वारे तपासणी केल्यानंतर हा फुफ्फुसांमध्ये गोल आकारात अस्तित्वात असल्याचं दिसतं, त्यामुळे याला लंग बॉल असं म्हणतात. कोरोनामुळे जसा फुफ्फुसांवर प्रतिकूल परिणाम होतो, तसाच परिणाम व्हाईट फंगसमुळे होत असल्याने रुग्णाच्या जीवाला धोका संभवतो. डॉ. आरती अग्रवाल यांनी फंगस हे सर्वसाधारणपणे कमी प्रमाणात आढळतात. सुरुवातीलाच याबाबत निदान झालं तर फार नुकसान होत नाही पण जर उपचारांना उशीर झाला तर हे फंगस नुकसानदायी ठरू शकतात. हा फंगस शरीरातील प्रत्येक अवयवावर परिणाम करू शकतो.
त्वचा, नखं, तोंडातील आतील भाग, आतडी, किडनी, पित्ताशय तसेच मेंदुलाही तो विळखा घालू शकतो. त्यामुळे वेळीच याचा संसर्ग आटोक्यात आणला नाही तर अवयव निकामी होऊन रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. फुफ्फुसांची एचआरसीटी तपासणी केल्यास ज्या प्रमाणे ब्लॅक फंगस दिसतो तसाच व्हाईट फंगसही दिसून येतो. कमजोर रोगप्रतिकारक शक्ती असलेले मधुमेही रुग्ण आणि दिर्घकाळ स्टेरॉईड घेत असलेल्या रुग्णांना याचा जास्त धोका असतो. त्यामुळे कोरोनामुळे दीर्घकाळ रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि स्टेरॉईड घेत असलेल्या रुग्णांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. या फंगसचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या तोंडात दह्यासारख्या पांढऱ्या पदार्थासारखा थर दिसून येतो.
फंगस ज्या भागात आढळला आहे, त्या भागातून सॅम्पल घेऊन बायोप्सी किंवा रक्त तपासणी केली तर त्याबाबत माहिची मिळते. रुग्णाला बाहेरुन कोणतीही लक्षणं जाणवत नाही. त्यामुळे सिटीस्कॅन (CT Scan) शिवाय पर्याय नसतो. डॉक्टर्स स्कॅन रिपोर्टच्या आधारे हा ब्लॅक फंगस आहे की व्हाईट फंगस हे ठरवतात.
लंग बॉल होण्यापूर्वी जाणवतात ही लक्षणे
- त्वचेवर संसर्ग होण्यापूर्वी 1 ते 2 दोन आठवडे आधी लहान आणि वेदनाविरहीत गोल फोड येतो.
- व्हाईट फंगस जर फुफ्फुसामध्ये पोहोचला तर खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे आणि ताप येऊ शकतो.
- संसर्ग पायांपर्यंत पोहोचला तर आर्थरायटीसप्रमाणे वेदना सुरू होतात आणि रुग्णास चालताना त्रास होऊ लागतो.
- मेंदुपर्यंत संसर्ग पोहोचला तर विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. तसेच डोकेदुखी सुरू होऊन चक्कर येऊ लागते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.