- डॉ. अविनाश सुपेआजच्या घडीला मेट्रो शहरातील नागरिकांची जीवनशैली झपाट्याने बदलत असल्याने, मानसिक ताण-तणावाचा आलेखही चढता आहे. भविष्यातही याचे स्वरूप अधिक विस्तारेल, त्यामुळे याविषयी उपचार करण्यासाठी समुपदेशनासाठी कृतिशील आराखडे तयार करण्यावर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी भर दिला पाहिजे. मुंबईतही प्रदूषणामुळे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. हवेमध्ये होणाºया बदलांमुळे पुढच्या वर्षी व्हायरल आजारांचे सावट आहे. गेल्या वर्षी साथीच्या रोगांवर नियंत्रण आणण्यात यश मिळाले, परंतु वायुप्रदूषणामुळे होणाºया आजारांचे प्रमाण वाढू शकण्याची शक्यता आहे.पालिका रुग्णालयांंमध्ये वापरण्यात येणारी अद्ययावत वैद्यकीय उपकरणे आणि यंत्रणा ही गरीब रुग्णांना डोळ्यांसमोर ठेवून घेतली जातात. त्यामुळे नव्या वर्षात गरीब रुग्णांना मिळणारा लाभ लक्षात घेऊन, अद्ययावत यंत्रणेचा स्वीकार करण्यात येईल. याचेच उदाहरण म्हणून गेल्या वर्षी टेलिमेडिसीनही सुरू करण्यात आले आहे. नव्या वर्षात नवीन अतिदक्षता विभागही पालिका रुग्णालयांत सुरू करण्यात येणार आहे. त्याचे स्वरूप नव्या पद्धतीनुसार डिझाइन केलेले असेल.राज्यात अॅलोपथीचा वापर करणाºया परवानाप्राप्त डॉक्टरांची संख्या सव्वा लाखाच्या आसपास आहे. जनरल प्रॅक्टिस व कन्सल्टंट प्रॅक्टिस यांच्यामध्ये ३:१ असे गुणोत्तर असायला हवे, ते आता उलट १:३ झालेले आहे. राज्यात पॅरामेडिक व नर्सेसची संख्याही कमी आहे. पॅरामेडिक अभ्यासक्रम मान्यताप्राप्त नाही. या मुद्द्यांच्या बाबतीत आपण काही नियोजन व दिशा ठेवायला हवी. वैद्यकीय मनुष्यबळ कमी असेल, तर आरोग्यसेवा अडखळतात, तसेच जास्त असेल, तर स्पर्धात्मक व महागड्या होतात, त्यांचा समतोल आवश्यक आहे.(लेखक केईएम रुग्णालयाचेअधिष्ठाता आहेत.)
ताण-तणावावर समुपदेशनाचा उतारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 5:53 AM