Eye Care Tips For Monsoon: पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. अशा पाण्यातून चालल्यास लेप्टोस्पायरोसिस होण्याची शक्यता असते. मात्र, हेच दूषित पाणी डोळ्याला लागल्यामुळे डोळ्याचा लेप्टोस्पायरोसिस होऊ शकतो, असे नेत्रविकार तज्ज्ञ सांगतात. विशेष म्हणजे पावसाळ्यात कोणतेही दूषित पाणी डोळ्यात जाणार नाही, याची काळजी घेण्याची गरज असते. या काळात डॉक्टर शक्यतो कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करू नये, असे सुचवितात. कारण त्यामुळे डोळ्याचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.
पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल?
१) अनेकवेळा नकळतपणे आपला हात डोळ्याला लागत असतो. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी आपले हात वारंवार साबण आणि पाण्याने धुवा.
२) डोळ्यांना सारखा हात लावणे आणि डोळा चोळणे थांबवा.
३) डोळ्याचा मेकअप टाळावा.
४) कॉन्टॅकट लेन्स वापरण्याची गरज असेल तर पाणी गरम करून घ्या. त्यामध्ये लेन्स स्वच्छ कराव्यात. तसेच काहीवेळा एका दिवसाच्या डिस्पोजेबल लेन्स मिळतात. त्याचा वापर करावा, तसेच कॉन्टॅक्ट लेन्स हाताळताना नेहमी हात स्वच्छ धुवावेत.
कॉन्टॅक्ट लेन्समुळे डोळ्याचा संसर्ग आल्याच्या तक्रारी पावसाळ्यात अधिक प्रमाणात येतात. त्यामुळे शक्यतो पावसाळ्यात लेन्स वापरू नये असा सल्ला रुग्णांना दिला जातो. मात्र, एखाद्याला वापरायच्या असतील तर कोणती काळजी घ्यावी याचे तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेऊनच वापर करावा. तसेच जर डोळ्याला संसर्ग झाल्यास स्वतःच्या मनाने बाजारात मिळणारे कोणतेही औषध डोळ्यात घालू नका, अन्यथा गुंतागुंत होण्याची शक्यता असते. वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मगच डोळ्याचे उपचार घेणे योग्य असते. असे एक्सपर्ट सांगतात.
पावसाळ्यात विषाणू संसर्गाचा धोका-
पावसाळ्यात दूषित पाण्याचा धोका असतो. तसेच मोठ्या प्रमाणात विषाणू-जिवाणू पावसात आढळून येतात. त्यामुळे पावसाळ्यातील दूषित पाणी आपल्या डोळ्याला लागल्यास त्यातील जिवाणूमुळे संसर्ग होऊ शकतो.
कॉन्टॅक्ट लेन्स टाळणेच बरे-
पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्यास काही वेळा डोळ्याचे बुब्बुळ आणि कॉन्टॅक्ट लेन्सच्या मध्ये दूषित पाण्याचा संपर्क आल्यास डोळ्याला इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो चष्याचा वापर करावा, असते डॉक्टर सांगतात.