सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे. लहान मोठे सारेच जण सतत स्मार्टफोनमध्ये गुंतलेले आपल्याला दिसतात. परंतु या स्मार्टफोनच्या युगामुळे लोकांच्या सामाजिक जीवनाला फार नुकसान होते. स्मार्टफोन आणि त्यावर उपलब्ध असणाऱ्या सर्व सोशल मीडिया साईट्सच्या अतिवापरामुळे लोकांमध्ये एकटेपणा आणि वेगळे राहण्याच्या वृत्तीमध्ये वाढ होत आहे. जगभरातील लोक मोठ्या प्रमाणावर फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप यांसारख्या सोशल मीडिया साईट्सवर खुप वेळ घालवतात. त्यांची ही सवय आरोग्याच्या दृष्टीने नुकसानकारक ठरू शकते. अनिद्रा, तणाव, एकटेपणासारख्या समस्या भेडसावतात. आपण जाणून घेऊयात सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आरोग्यावर होणारे परिणाम...
आत्मविश्वास कमी होणे
सोशल मीडियावर सर्फिंग करत असताना दुसऱ्यांचे अकाउंट पाहून इतरांबाबत मनात ईर्षा निर्माण होते. त्यांनी केलेल्या पोस्टची तुलना स्वतःच्या पोस्टशी केली जाते. अशा गोष्टींमुळे स्वतःची तुलनाही इतरांशी केली जाते. त्यामुळे नकळत आत्मविश्वास कमी होतो. एका वेबसाईटने केलेल्या रिसर्चमध्ये असे समोर आले आहे की, अनेक फेसबुक युजर्स इतरांप्रति ईर्षा करू लागतात.
सामाजिक संबंध
माणूस हा समाजशील प्राणी असल्याचे आपण अनेकदा ऐकले आहे. सोशल मीडियाच्या युगात आपल्या सामाजिक आयुष्यावर खूप प्रभाव पडला आहे. जास्तीत जास्त वेळ सोशल साईट्सवर घालवल्यामुळे नात्यांमध्ये दूरावा येत आहे. बऱ्याचदा एकाच घरात राहूनसुद्धा लोकं एकमेकांशी व्हॉट्सअॅपवर बोलतात. त्यामुळे व्यक्तिंच्या सामाजिक आयुष्यावर परिणाम होत आहे.
आठवणी
आपल्या आयुष्यातील खास गोष्टींचे फोटो आठवण स्वरूपात साठवण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. हे फोटो फेसबुक अथवा इतर सोशल मीडिया साईटवर अपलोड करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. परंतु यामुळे ते क्षण प्रत्यक्षात अनुभवायचे मात्र राहून जाते. तसेच सोशल मीडियाच्या या अतिवापरामुळे अनेकदा चुकीच्या गोष्टींसाठीही केला जातो.