(Image Credit : Ars Technica)
शरीर वेगवेगळ्या आजारांच्या जाळ्यात येतं ते पोटातील समस्यांपासून. म्हणजे आजारांचं मूळ हे पोटात आहे, असं म्हटलं जातं. पोट जर व्यवस्थित असेल, तर आजार जवळही येणार नाहीत. पोटाच्या वेगवेगळ्या समस्यांचा सामना अनेकांना सतत करावा लागतो. त्यात सर्वात जास्त भेडसावली जाणारी समस्या म्हणजे गॅस. पोटात गॅस तयार झाल्यास अस्वस्थ वाटू लागतं. गॅसेसमुळे वेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यात गॅस पास करणे यातही अनेकांना संकोच असतो, त्यामुळे समस्या अधिक वाढतात. मात्र संशोधकांनी एक अशी टॅबलेट तयार केली आहे. जी पोटाच्या आता जाऊन पोटातील गॅसबाबत तुम्हाला स्मार्टफोनवर माहिती देणार आहे.
व्हिटॅमिनच्या टॅबलेटच्या आकाराची ही टॅबलेट पोटात जाऊन गॅस डिटेक्ट करते. पोटात तयार झालेल्या कार्बनडायऑक्साइड आणि ऑक्सिजनची रिअल टाइम माहिती ही टॅबलेट देऊ शकणार आहे. याने तुम्हाला हे कळेल की, काही खाल्ल्यानंतर तुमच्या पोटात किती गॅस तयार होत आहे. त्यामुळे पोट निरोगी ठेवण्यासाठी ही टॅबलेट गेमचेंचर ठरू शकते, असे मानले जात आहे. तसेच या टॅबलेटमुळे पुढे जाऊन पोटातील गॅस मोजणाऱ्या अॅपचेही दरवाजे खुले झाले आहेत. तज्ज्ञांचं असं मत आहे की, या अॅपचं नाव 'iफार्ट' असू शकतं.
कसं करते काम?
ही टॅबलेट ऑस्ट्रेलियातील RMIT यूनिव्हर्सिटीने तयार केली आहे. या टॅबलेटमध्ये एक असं तंत्र आहे ज्यात गॅस सहजपणे जाऊ शकतो. त्यासोबतच यात मायक्रोकन्ट्रोलर, बॅटरी, एंटीना आणि वायरलेस ट्रान्समिटरही असतं. काही वेळ शरीरात राहिल्यावर ही टॅबलेट गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅकच्या माध्यमातून बाहेर येते.
कॅन्सरच्या उपचारासाठी फायदेशीर
या टॅबलेटच्या चाचणीतून समोर आलं आहे की, हाय फायबर डाएट घेणाऱ्यांना जास्त प्रमाणात ऑक्सिजन गॅस तयार होण्याची समस्या झाली. याआधीपर्यंत असा विचार केला जात होता की, मोठ्या आतड्यांमध्ये ऑक्सिजन तयार होत नाही. अशात आतड्यांच्या कॅन्सरच्या उपचारासाठी सुद्धा ही टॅबलेट महत्त्वाची भूमिका बजावू शकते.