शादी का लड्डू जो खाए वो पछताए, जो न खाए वो भी पछताए.. असं म्हटलं जातं. स्त्री असो किंवा पुरुष, एकूणच लग्नापूर्वी सगळ्यांचं आयुष्य बऱ्यापैकी स्वच्छंदी असतं, आपल्या मनाप्रमाणे वागण्याची मुभा त्यांना असते, पण लग्न झालं की त्यांचं आयुष्य बदलतं, अनेक जबाबदाऱ्या अंगावर येतात. अचानक घ्याव्या लागलेल्या या जबाबदाऱ्यांमुळे बऱ्याच जणांची धांदल होते, धावपळ होते, अनेक गोष्टी नव्यानं शिकाव्या लागतात. पहिलं मूल झाल्यानंतर तर त्यात आणखीच वाढ होते. लग्नानंतर लाइफस्टाइलमध्ये सगळ्यात जास्त बदल होतो तो स्त्रियांच्या बाबतीत. पण एवढंच नाही. एकदम आलेल्या नव्या जबाबदाऱ्यांमुळे लग्नानंतर महिलांच्या मेंदूतही बरेच बदल होतात. पहिलं मूल झाल्यानंतरचे मेंदूतले हे बदल सर्वांत जास्त असतात. घरात आलेल्या नव्या बाळामुळे महिलांच्या शरीर आणि मेंदूत बऱ्याच मोठ्या प्रमाणात बदल होतात. नव्या जबाबदाऱ्या त्यांना सक्षमपणे पार पाडता याव्यात, यासाठी निसर्गानेच तशी रचना केली आहे.
मूल झाल्यानंतर स्त्रियांच्या मेंदूत होणाऱ्या बदलांचा आजवर खूप मोठ्या प्रमाणावर अभ्यास झाला आहे. त्या तुलनेत पुरुषांच्या मेंदूचा अभ्यास झालेला नाही. लग्नानंतर आणि पहिलं मूल झाल्यानंतर पुरुषांच्या शरीर-मेंदूवर काय, कोणते आणि कसे परिणाम होतात, यासंदर्भात काही प्रमाणात अभ्यास झाले असले, तरी त्याच्या फारसं खोलात संशोधक गेलेले नव्हते. आता मात्र संशोधकांनी याबाबतीत अतिशय खोलात जाऊन अभ्यास केला आहे. पहिलं मूल झाल्यानंतर पुरुषांच्याही मेंदूत बदल होतात, याबाबतच्या विस्तृत नोंदी संशोधकांनी आता केल्या आहेत. बाळाच्या जन्मानंतर स्त्रियांमध्ये झालेले शारीरिक-मानसिक बदल अगदी स्पष्टपणे सगळ्यांना जाणवतात. पुरुषांमधे मात्र असे बदल होत नाहीत, असं मानलं जात होतं. कारण ते प्रत्यक्ष आणि स्पष्टपणे जाणवत नव्हते. पण हे बदल जाणवत नसले, तरी लग्न आणि विशेषत: पहिलं मूल झाल्यानंतर पुरुषांच्या मेंदूच्या रचनेत लक्षणीय बदल होतो, असं संशोधकांचा अभ्यास सांगतो.
पहिल्यांदा पिता झाल्यानंतर पुरुषांचा मेंदू थोडा आक्रसतो. त्यांच्या स्वच्छंदी जीवनाला थोडा आळा बसतो. आपल्या स्वत:चा, आपल्या कुटुंबाचा, कुटंबात आलेल्या नव्या बाळाचा ते गांभीर्यानं विचार करू लागतात. वेगवेगळ्या विचारांच्या प्रवाहात त्यांचं मन विहार करायला लागतं. यातूनच भविष्याविषयी अनेक स्वप्नंही त्यांच्या मनात विणायला, गुंफली जायला सुरुवात होते. अर्थात, पुरुषांमध्ये होणाऱ्या या मानसिक बदलांचं प्रमाण स्त्रियांमध्ये होणाऱ्या बदलांपेक्षा बऱ्याच प्रमाणात कमी आहे. पण ते इतकंही कमी नाही, की त्याची दखलही घेता येणार नाही. ‘सेरेब्रल कॉर्टेक्स’ या सायन्स जर्नलमध्ये ही माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. संशोधकांनी लग्न झालेल्या आणि संभाव्य पितांच्या मेंदूचा अभ्यास केला. त्यांचा मेंदू स्कॅन केला. त्यातील अवस्थांचं निरीक्षण केलं. त्या नाेंदी टिपून ठेवल्या. त्यातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्यासमोर आल्या.
लग्न झाल्यांनतर काही काळानंतर पुरुषाच्या मेंदूत काही बदल घडून येतात, पण पहिलं मूल झाल्यानंतर मात्र पुरुषांचा मेंदू हळू हळू आकुंचित व्हायला लागतो. त्यामुळे पुरुषांच्या मेंदूच्या काही भागावर दबाव निर्माण होतो. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवरही होतो. त्याचे दृष्य आणि अदृष्य परिणाम पुरुषाच्या विचारसरणीत घडून येतात. अभ्यासातील प्रमुख संशोधक डार्बी सॅक्सबे यांच्या मते पुरुष पिता बनल्यावर त्याच्या मेंदूच्या मागच्या भागातील कॉर्टेक्सवर सर्वांत जास्त दाब निर्माण होतो. रेटिनाद्वारे या सूचना मेंदूपर्यंत पोहोचतात आणि या सूचना नंतर समजामध्ये परावर्तित होतात. याच कारणामुळे पुरुषांच्या मनात आपल्या बाळाविषयी प्रेम, आकर्षण निर्माण होतं आणि ते आपल्या बाळाकडे आकृष्ट होतात. काही संशोधकांच्या मते दुसऱ्या बाळाच्या जन्माच्या वेळी पित्याच्या मेंदूमध्ये अधिक प्रमाणात बदल होतात आणि त्यामुळे त्यांना आपोआपच आपल्यावरील जबाबदाऱ्यांचं भान येतं आणि ते अधिक काळजीपूर्वक वागू लागतात. त्यांच्या स्वच्छंद मनोवृत्तीला आळा बसतो आणि आपल्या भवितव्याचा, आपल्या कुटुंबाचा आणि त्यांच्या सुखकर भविष्याचा ते गंभीरपणे विचार करायला लागतात.
बाळामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा संशोधकांच्या मते लग्न आणि मूल झाल्यानंतर दाम्पत्याच्या मेंदूमध्ये जे बदल दिसून येतात, ते त्या कुटुंबाच्या भवितव्यासाठी अतिशय चांगले असतात. त्यामुळेच आनंदानं ते आपल्या नव्या जबाबदाऱ्या अंगावर घेतात. मुलांची देखभाल हे त्यांना ओझं वाटत नाही. दोन्ही पालक मिळून आपल्या बाळाचा सांभाळ करतात. अर्थात, याचा एक विपरीत परिणामही दिसून येतो. मूल झाल्यानंतर पती-पत्नीच्या नात्यात साधारण वर्षभरापर्यंत थोडा दुरावा निर्माण होतो.