आपल्या स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या बहुतांश पदार्थांसाठी तेल वापरलं जातं. क्वचितच पदार्थ असतील जे तेलाशिवाय तयार होतात. त्यातही सध्याच्या धावपळीच्या काळात आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी फारच बदलल्या आहेत. फास्ट फूड खाण्याचं प्रमाण वाढलं आहे. घरी बनवायला वेळ मिळाला नसेल तर बाहेर जाऊन खायचं किंवा बाहेरून मागवून खायचं, या सवयी रुढ होत चालल्या आहेत. तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास ते आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात.
रोजच्या स्वयंपाकात आपण खाद्यतेल म्हणजेच कुकिंग ऑइलचा वापर करतो. हे खाद्यतेल वेगवेगळ्या प्रकारचं असतं. ही सर्वच तेलं आरोग्यासाठी चांगली असतात, असं नाही. त्यातल्या काही प्रकारच्या तेलांच्या दीर्घकालीन वापरामुळे आपल्याला हाय ब्लडप्रेशर, हार्ट अटॅक, कोरोनरी आर्टरी डिसिज, ट्रिपल व्हेसल डिसिज आणि डायबेटिस यासारखे आजार होण्याचा धोका असतो. तेलकट अन्न खाल्ल्याने आपल्या रक्तातील लो डेन्सिटी लिपोप्रोटीनची लेव्हल हाय डेन्सिटी लिपोप्रोटीनपेक्षा जास्त होते आणि ते शरीरासाठी धोकादायक असतं. या संदर्भात झी न्यूज हिंदीने वृत्त दिलंय.
जाहिरातींतून लो फॅट आणि हेल्दी असल्याचा दावा करणारी अनेक तेलं बाजारात मिळतात; पण ही तेलं शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढवतात. या तेलांमध्ये सॅच्युरेटेड फॅट आढळतं आणि ते आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी अनसॅच्युरेटेड फॅट हा योग्य पर्याय आहे. या तेलांच्या सेवनाने शरीरातील लो डेन्सिटी लिपोप्रोटीनचं प्रमाण कमी करता येते.
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी 5 तेलंकोणत्या तेलात अनसॅच्युरेटेड फॅट आहे आणि कोणतं तेल आरोग्यासाठी चांगलं आहे, याबद्दल प्रसिद्ध न्युट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्सयांनी माहिती दिली. त्यांच्यामते, ऑलिव्ह ऑइल, कॉर्न ऑइल, सनफ्लॉवर ऑइल, पांढऱ्या मोहरीचं तेल आणि नट्स ऑईल शरीरासाठी उत्तम आहेत.
कोलेस्टेरॉल कमी करण्याचे इतर पर्यायशरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी जास्तीतजास्त फायबरयुक्त पदार्थ खा, जंक आणि फास्ट फूड खाणं टाळा, दररोज व्यायाम करा, बीटा ग्लुकन पदार्थ खा आणि दारूचं व्यसन सोडा. या पाच सवयींमध्ये बदल करून तुम्ही तुमच्या शरीरातलं कोलेस्टेरॉल कमी करू शकता. तसंच तुम्हाला तळलेले तेलकट पदार्थ खायची सवय असेल तर ती सवय बदला. त्यामुळे तुमचं कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होईल.