आजच्या जीवनशैलीमध्ये अनियमित आहार आणि कमी शारीरिक हालचाली लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या अनेक आजारांना आमंत्रण देतात. अनेकांचे बैठे काम तसेच शारीरीक हालचाली होतच नसल्यानं विविध आजार डोकं वर काढत आहेत. अलिकडच्या धावपळीच्या युगात अनेक जण कामात खूपच व्यस्त राहतात आणि त्यांना दिवसभरात व्यायामासाठी थोडाही वेळ काढणं जमत नाही. पण खरंतर व्यायाम करणे ही आता रोजची सवय बनवण्याची गरज आहे. त्यामुळे विविध प्रकारचे कर्करोग (Cancer) होण्यापासून आपली आधीच सुटका होऊ शकते.
अलिकडं अनेकांनी चालणं सोडून दिलं आहे, जिने चढणे कमी झाले आहेत, अन्नामध्ये फळे-हिरव्या भाज्या कटाक्षाने खाण्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होतं. धावपळीच्या जीवनात ताण कमी करण्यासाठी काही लोकांना व्यसनही लागली आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की, या सर्व गोष्टी आपल्याला काही गंभीर आजारांकडे घेऊन जात आहेत. अमेरिकेत करण्यात आलेल्या एका नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की, जर अमेरिकन लोक दर आठवड्याला किमान ५ तास मध्यम ते तीव्र पातळीवरील शारीरिक हालचाली (moderate to intense level) करत असतील तर सरासरी ४६ हजारांहून अधिक लोकांना कर्करोगापासून दरवर्षी वाचवता येऊ शकते.
हे संशोधन जर्नल ऑफ मेडिसिन अँड सायन्स इन स्पोर्ट्स अँड एक्सरसाइजमध्ये प्रकाशित झाले आहे. या संशोधनाच्या आकडेवारीनुसार, २०१३ ते २०१६ दरम्यान ३० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये शारीरिक हालचालींचा अभाव असल्याचे दिसून आले. परंतु हे प्रमाण पुरुषांच्या (१४ हजार २७७ प्रकरणे) तुलनेत महिलांमध्ये ३२ हजार ०८९ प्रकरणे) जास्त होते.
केंटकी, वेस्ट व्हर्जिनिया, लुइसियाना, टेनेसी आणि मिसिसिपी सारख्या अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये स्त्रियांना शारीरिक हालचाली आणि कर्करोगाच्या घटनांमध्ये जास्त समानता असल्याचे दिसून आले. उटा, मोंटाना, वायोमिंग, वॉशिंग्टन आणि विंकान्सीन या पर्वतीय राज्यांमध्ये हे प्रमाण स्त्रियांमध्ये कमी असल्याचे दिसून आले.
अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, हे पहिले संशोधन आहे ज्यात कॅन्सरला शारीरिक हालचालींच्या अभावाशी जोडले गेले आहे. ते म्हणतात की अशा कॅन्सरमध्ये ब्रेस्ट, एंडोमेट्रियल कॅन्सर, कोलन कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, किडनी कॅन्सर इ. होतात. सर्वाधिक पोटाच्या कर्करोगाची टक्केवारी १६.९ आहे. सर्वात कमी ३.९ मध्ये मूत्राशयाच्या कर्करोगाचा समावेश आहे.