आपल्या आहारात पोषक घटकांनीयुक्त असलेल्या पदार्थांचा समावेश असलाच पाहिजे. मात्र जेव्हा अशा पदार्थांमध्ये भेसळ असते तेव्हा हे पदार्थ आपल्या शरीराला घातक ठरतात. भाज्यांमध्ये मिळणारे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचे असतात. पण काहीवेळा बाजारात मि्ळणाऱ्या भाज्यांमध्ये भेसळ असू शकते.
बरेचदा बाजारात मिळणाऱ्या भाज्या ताज्या आणि हेल्दी आहेत का? हे तपासणं कठीण जातं. भेसळयुक्त भाज्यांचे आपल्या शरीराला फार मोठ्या प्रमाणावर तोटे असतात. त्यामुळे त्यांची गुणवत्ता व्यवस्थित तपासुन घेणे महत्त्वाचे ठरते. जर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की बाजारात मिळणाऱ्या भाज्यांमधील भेसळ कशी तपासावी तर याबाबत फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया FSSAI म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांनी काही उपाय सांगितले आहेत. या उपायांचा वापर करुन तुम्ही खाद्यपदार्थांमधील भेसळ ओळखु शकता.
त्यांनी याबात ट्वीटरवरील त्यांच्या अधिकृत हँंडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओमध्ये असे दाखवले आहे की कापसाच्या बोळ्याला प्रथम लिक्वीड पॅराफिनमध्ये बुडवून घ्या. हिरव्या भाजीवर हा कापूस हलक्या हाताने चोळा. काही क्षणांतच तुम्हाला समजेल की ही भाजी भेसळयुक्त आहे की नाही.
जर कापसाचा रंग बदलला तर समजा या भाजीमध्ये भेसळ आहे. नाही बदलला तर समजावे ही भाजी भेसळयुक्त नाही. भाज्या हिरव्यागार दिसाव्यात म्हणून वापरला जाणारे मॅलाकाईट ग्रीन हे एक टेक्सटाईल डाय आहे ज्याचा उपयोग माशांवर अँटीप्रोजोटॉल व अँटीफंगल उपचारांसाठी केला जातो. तसेच याचा उपयोग अन्न उत्पादने, इतर उत्पनादने, हेल्थ टेक्साटाईल यामध्येही केला जातो. याचा मिरच्या, मटार व पालक यांच्यासारख्या भाज्या अधिक हिरव्यागार दिसाव्यात म्हणून वापर केला जातो.नॅशनल सेंटर ऑफ बायोटेक्नॉलॉजीनुसार या डायचे विष वेळ आणि तापमानानुसार वाढते. हे कॅन्सरचे कारण ठरु शकते तसेच मल्टीऑर्गन पेशींनाही धोका पोहचवते.
याच पद्धतीने भेसळयुक्त हळद कशी ओळखावी हे देखील सांगितले आहे. यासाठी दोन पाण्याचे ग्लास घ्या. एकात भेसळ नसलेली हळद टाका व दुसऱ्यात भेसळयुक्त. तुमच्या लक्षात येईल की, एका पाण्यातली हळद तळाशी जाऊन बसते व पाण्याचा रंग हलका पिवळा होता. तर दुसऱ्या ग्लासातली हळद पुर्णत: पाण्याच्या तळाशी जाऊन बसत नाही तसेच पाण्याचा रंग गडद पिवळा होतो. ही हळद भेसळयुक्त आहे हे ओळखावे.
याचपद्धतीने तुम्ही मीठाचीही चाचणी करु शकता. यासाठी तुम्ही बटाट्याचे दोन तुकडे करा. एका तुकड्याला भेसळ नसलेले मीठ लावा व दुसऱ्या तुकड्याला भेसळयुक्त मीठ लावा. थोड्यावेळाने त्या दोन्ही बटाट्याच्या तुकड्यांवर लिंबाचा रस टाका. भेसळयुक्त मीठाचा तुकडा मीठ लावलेल्या जागी निळा झाला असेल.