सध्याच्या वाढत्या प्रदूषणाला तोंड देण्याकरिता शरीर सुदृढ असणे अत्यंत आवश्यक आहे. डेंग्यु, मलेरिया यासारख्या आजारांना तोंड देण्याकरिता पौष्टिक आणि समतोल आहार गरजेचा आहे. प्रदूषित वातावरणामुळे फुफ्फुसांचे विकार, डोळ्यांचे आजार, श्वासविकार इत्यादी आजारांचा धोका संभवतो. यापासून रक्षण होण्याकरिता पाहूया आहारात कोणत्या घटकांचा समावेश कराल ?
संत्र्यामध्ये 'सी' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढायला मदत होते. संत्र्यातील अँण्टीऑक्सिडंट तत्त्वे जी शरीराचे विविध आजारांपासून रक्षण करतात. विशेषत: ऋतुमानानुसार होणाऱ्या आजारांशी लढण्याकरिता आवश्यक असलेली शक्ती जीवनसत्त्व 'सी'मुळे मिळते. याकरिता रोजच्या आहारात संत्र्याचा समावेश करा.
हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आहारात केल्याने पोषक तत्त्वे, जीवनसत्त्वे आणि प्रथिने शरीराला मुबलक प्रमाणात मिळतात. यामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढते आणि प्रदूषणापासून रक्षण होते.
प्रदूषणापासून वाचण्याकरिता आहारात आल्याचा समावेश करावा. आल्यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात. यामुळे प्रदूषणापासून रक्षण होते. आल्याचा काढा किंवा आल्याचा चहा घेतल्याने कफ, सर्दी अशा समस्या दूर होतात.
गूळ खाल्ल्याने शरीराचे तापमान नियंत्रणात राहते. गुळात आयर्नचे प्रमाण जास्त असते. गूळ खाल्ल्याने आयर्न रक्तात मिसळते. यामुळे रक्तातील ऑक्सीजनची पातळी वाढते. यामुळे प्रदूषणापासून लढण्यासाठी मदत होते. फुफ्फुसातला कफ, सर्दी यावर गूळ गुणकारी आहे. याकरिता चहात गूळ घालून घेतल्याने जास्त फायदा होतो.
आवळ्याला 'अमृतफळ' असे म्हणतात. शरीरासाठी आवळा हे वरदान आहे. आवळा हा जीवनसत्त्व 'सी'चा समृद्ध स्त्रोत आहे. यामध्ये अँण्टीऑक्सीडंटही असतात. यामुळे फ्री रेडिकल (विषारी द्रव्ये) शरीराबाहेर टाकली जातात. वातावरणातील प्रदूषणाचा परिणाम होऊ नये याकरिता आवळा खावा. आवळ्याच्या नियमित सेवनाने बरेचसे आजार दूर व्हायला मदत होते.
काळीमिरीमध्ये जीवनसत्त्व आणि मिनरल्स असतात. काळीमिरी घातलेला चहा किंवा काढा घेतल्याने जुनाट कफ लवकर निघतो. काळीमिरी उष्ण असल्याने सर्दी, खोकल्यासारख्या विकारात आराम मिळतो. याकरिता काहीजण दररोज मधात काळीमिरी पावडर घालून त्याचे चाटण घेतल्याने प्रदूषणापासून रक्षण होऊ शकते.