तेल अवीव : इस्रायल कोरोनाविरूद्धच्या युद्धात सुरुवातीपासून पुढे आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी इस्रायलने प्रत्येकवेळी शक्य ते पाऊल उचलले. या देशात कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे इस्रायलचे जगभर कौतुक झाले. अनेक देश आपल्या नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यासाठी संघर्ष करत असताना, इस्रायलचे आरोग्य तज्ज्ञ सलमान जारका म्हणाले की, कोरोना लसीचा चौथा डोस देखील आवश्यक आहे.
वेबसाइट WION मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, इस्रायलने आपल्या सर्व नागरिकांना कोरोना विषाणूचे बूस्टर शॉट्स देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) देशांना बूस्टर कार्यक्रम सुरू न करण्याचे आवाहन केले आहे. जोपर्यंत इतर सर्व देश कमीतकमी असुरक्षित लोकांना लसीकरण करण्यास सक्षम होत नाहीत, तोपर्यंत हे केले जाऊ नये, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
कोरोनाचे अनेक व्हेरिएंट समोर येत आहेत. डेल्टा व्हेरिएंटची प्रकरणे खूप वेगाने वाढत आहेत. यामुळे भीती आहे की यामुळे मृत्यू आणि रुग्णालयात दाखल झालेल्यांची संख्या वाढू शकते. कोरोना लसीच्या चौथ्या डोसची काही काळानंतर गरज भासू शकते. आपण यासाठी तयार असले पाहिजे, असे सलमान जारका म्हणाले. दरम्यान, आरोग्य तज्ज्ञ सलमान जारका यांच्या मते, बूस्टर शॉट्स कोरोना व्हेरिएंटपासून संरक्षण करण्यास सक्षम आहे. डेल्टा व्हेरिएंटच्या वाढत्या प्रकरणांमध्ये बूस्टर शॉट्सची गरज वाढली आहे.
सलमान जारका यांनी कोरोनाच्या पुढील लाटेबाबतही इशारा दिला. आपण कोरोनाच्या चौथ्या लाटेपासून धडा घेतला पाहिजे. कोरोनाचे आणखी नवीन व्हेरिएंट येऊ शकतात, जसे दक्षिण अमेरिका खंडात घडत आहे, असे सलमान जारका यांनी सांगितले. तसेच, आरोग्य अधिकारी असेही म्हणतात की भविष्यात कमीतकमी 6 महिने किंवा वर्षभर बूस्टर शॉट्स लागतील.