वाशिम : विविध कारणांमुळे पायांवर सूज येत असल्याच्या तक्रारी घेऊन रुग्ण हे डॉक्टरांकडे तपासणीसाठी येत असल्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढीस लागले आहेत. पायावर वारंवार सूज येत असल्याचे किडनीसह, हृदयविकार, हार्ट फेल होण्याचा धोकाही अधिक असतो. त्यामुळे पायांवर सूज येत असल्यास तपासणीस विलंब नको, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.
पायांना सूज येण्याची समस्या अनेकांमध्ये आढळते. सामान्यत: वयस्कर लोकांमध्ये बराच काळ एकाच ठिकाणी बसणे अथवा उभे राहिल्यास हालचाल कमी झाल्याने पाय सुजण्याची समस्या आढळत आहे. त्याचप्रमाणे हृदयविकार, किडनीविकार, फुफ्फुसामुळे हृदय फेल होणे, कुपोषण, थायरॉईड, रक्तधमण्या मोठ्या होऊन निकामी होणे, रक्तवाहिनीमध्ये रक्त गोठणे अशा अनेक समस्यांमध्येही पायाला सूज येण्याची लक्षणे आढळतात. पायांवर सूज येणे हा आजार नाही, तर एक लक्षण आहे. पाय सुजण्याचे नेमके कारण लक्षात आल्यास वेळीच योग्य ते उपचार करणे शक्य होते. जास्त विलंब केल्यास गुंतागुंत निर्माण होण्याचा इशाराही डॉक्टरांनी दिला. त्यामुळे वेळ वाया न जाऊ देता, कोणत्या आजारामुळे पायावर सूज येत आहे याची तपासणी करून खात्री करावी, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला.
पीटिंग, नॉन-नीटिंग काय आहे?
विशेषत: शरीराच्या खालच्या भागातील टिश्श्यूजमध्ये द्रवपदार्थ साठल्यामुळे पायांना सूज येते. या समस्येला ‘ओडेमा’ असेही म्हणतात. या समस्येचे प्रमुख दोन प्रकार असतात. पीटिंग आणि नॉन-पीटिंग. यातील पीटिंग म्हणजे सूजेवर दाबले असता खळगा पडतो व पाच सेकंदांनी तो पूर्ववत होतो आणि नॉन-पीटिंग म्हणजे सुजेवर दाबले असता खळगा पडत नाही.
पायांवर सूज येते म्हणजे काय?
शरीरामध्ये पाणी हे पेशीच्या आत आणि पेशीच्या बाहेर असे विभाजित असते. पेशीबाहेर जे पाणी असते, ते आणखी रक्त धमनीबाहेर आणि रक्त धमनीच्या आत विभाजित असते. पाण्याची ही विभागणी अत्यंत जटिल प्रक्रियेद्वारे एकसारखी ठेवली जाते. जेव्हा या प्रक्रियेवरील नियंत्रण सुटले जाते, तेव्हा पाणी हे रक्त धमनीबाहेरील विभागात जास्त प्रमाणात जमा होते आणि ग्रॅव्हिटीमुळे पाणी हे पायांमध्ये जमा होते. त्यालाच पायावर सूज आली असे म्हटले जाते.
काय खबरदारी घ्यावी?
- मीठ कमी प्रमाणात खाणे
- पाय रात्री उशीवर ठेवून झोपणे
- जास्त वेळ पाय खाली टाकून न बसने किंवा उभे राहणे