गेल्या वर्षभरापासून ज्याची लोक आतुरतेने वाट पाहत होते तो गणेश उत्सव सुरु झाला आहे. हिंदू शास्त्रानुसार सर्वच कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करतात. गणपतीला दुर्वांची जुडी वाहतात. यामुळे गणपती प्रसन्न होतो. गणपतीला दुर्वा खूपच प्रिय आहेत, असं मानलं जातं. त्यामुळे एकवीस दुर्वांची मिळून केलेली जुडी गणपतीला अर्पण केली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का? बाप्पाला दुर्वा का वाहतात?
खरं तर बाप्पाच्या डोक्यावर दुर्वा वाहतात यामागे एक आख्यायिका आहे. ऋषी मुनी आणि देवता यांना अनलासूर नावाच्या राक्षसाने त्रास द्यायला सुरुवात केली होती. अनल अर्थात अग्नी. देवतांच्या विनंतीनंतर गणेशजींनी त्या असूराला गिळून टाकले. यामुळे गणेशाच्या पोटात जळजळ होऊ लागली. तेव्हा ८८ सहस्त्र मुनींनी प्रत्येकी २१ अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या. आणि कश्यप ऋषींनी दुर्वांच्या २१ जुडी गणेशाला खाण्यास दिली. त्यावेळी अथक प्रयत्नानंतरही गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली. त्यावेळी, यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल, असे गणराय म्हणाले होते. म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात.
लाडक्या विघ्नहर्त्याला वाहणाऱ्या दुर्वा आपल्या आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर असतात. दुर्वांमध्ये कॅल्शिअम, फायबर, फॉस्फरस, पोटॅशियम, प्रोटीन ही पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. जाणून घेऊया दुर्वांचे आरोग्यदायी फायदे...
डायबिटीसवर गुणकारी
दुर्वामध्ये 'हायपोग्लायस्मिक इफेक्ट' असतो, असे काही संशोधनांमधून सिद्ध झालं आहे. त्यामुळे अनेकदा डॉक्टर्सही डायबिटीसच्या रूग्णांना दुर्वांचा रस पिण्याचा सल्ला देतात.
युरिनरी ट्रॅक इंन्फेकशनवर फायदेशीर
अनेक स्त्रियांना युरिनरी ट्रॅक इंन्फेकशनच्या समस्येचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून दुर्वा फायदेशीर ठरतात.
रोगप्रतिकारशक्ती वाढते
शरीर निरोगी ठेवण्यासाठीही दुर्वा मदत करतात. दुर्वांमधील पोषक तत्व शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतात. त्यामुळे अनेक आजारांपासून सुटका करण्यास मदत होते.
पचनक्रिया सुधारते
खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे सध्या पोटाशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच दुर्वांचा रस प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्टाचा त्रास कमी होतो. नियमित दुर्वांचा रस घेतल्यास पित्ताचा त्रासही कमी होतो आणि शरीर नैसर्गिकरित्या डीटॉक्स होते.
दात आणि तोंडाचे आरोग्य
दुर्वांमध्ये 'फ्लॅवोनाईड्स’ या अतिशय पोषक घटकांचा समावेश असतो. त्यामुळे अल्सरचा त्रास होण्याचा धोका कमी होतो.हिरड्या सुधारतात तसेच तोंडाला येणारी दुर्गंधीसुद्धा कमी होण्यास मदत होते.
त्वचेच्या इन्फेक्शनपासून सुटका
खाज येणे, रॅश येणे अशा त्वचाविकारांवर दुर्वा उपयुक्त आहे. त्यातील दाहशामक व अॅन्टीसेप्टिक गुणधर्म असे आजार कमी करतात. यासाठी दुर्वाची पेस्ट हळदीत मिसळून त्वचेवर लावावी. कुष्ठरोगासारख्या गंभीर त्वचारोगामध्येदेखील हा नैसर्गिक उपाय फायदेशीर ठरतो.
रक्त शुद्ध करण्यासाठी उत्तम उपाय
दुर्वा नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करते. तसेच त्यामध्ये अल्कॅनिटीचे संतुलन ठेवण्यास मदत करते. यामुळे इजा, जखम झाल्यास किंवा मासिकपाळीतही अतिरिक्त प्रमाणात रक्तप्रवाह होत नाही. दुर्वा शरीरात लाल रक्तपेशी वाढवण्यास मदत करतात परिणामी शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाणही नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे अॅनिमियावर मात करणे शक्य होते.
हृद्याचे आरोग्य सुधारते
दुर्वामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण व सोबतच कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाणही नियंत्रणात राहते तसेच ह्द्याचेही कार्य सुधारते.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)