कॅलिफोर्निया- स्मृती तल्लख ठेवण्यासाठी, दिवसभर फ्रेश राहाण्यासाठी आणि सजग राहाण्यासाठी पुरेशा झोपेची गरज असते. मात्र जखमा भरुन येण्यासाठीही चांगल्या निद्रेची गरज असते असे आता संशोधनातून स्पष्ट झाले आहे. किंबहुना जखमा भरून येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पोषणमुल्यांपेक्षा निद्रेची मदत जास्त होते असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे.
जखम भरून येण्यासाठी रुग्णाला पोषणमुल्यं दिली की त्याची रोगप्रतिकारक क्षमता नीट होते आणि पर्यायाने तो बरा होतो त्यामुळे इतकी वर्षे जखमा त्वरित भरून येण्यासाठी फक्त पोषणमुल्यांवर संशोधन करण्यात आले होते. अमेरिकेतील नाटिक येथिल आर्मी रिसर्च इन्स्टीट्यूट आॅफ एन्व्हायर्नमेंटल मेडिसिन येथे ट्रेसी स्मिथ या पोषणशास्त्र संशोधक कार्यरत आहेत. त्यांनी व त्यांच्या संशोधकांच्या समुहाने काही धडधाकट लोकांवर प्रयोग करुन निरीक्षणे मांडली आहेत.
चाचणीसाठी तयार झालेल्या लोकांच्या हातावर विशिष्ट प्रकारे एकसारखी जखम तयार करुन फोड तयार करण्यात आले. त्या फोडांचा वरचा पापुद्रा काढून टाकण्यात आला. (ट्रेसी यांच्यामते या प्रक्रियेत व्यक्तीला वेदना होत नाहीत, फक्त थोडे खाजल्यासारखे वाटू शकते.) या लोकांमधील १६ जणांच्या समुहाला ७ ते ९ तासांची पुरेशी झोप मिळाली. तर २० जणांच्या २ गटांना पुरेशी झोप घेऊ दिली नाही. सलग तीन रात्री त्यांना केवळ दोनच तासांची झोप घेऊ दिली. जागं राहाण्यासाठी त्यांना पिंगपाँग खेळणं, व्हीडिओ गेम, टीव्ही पाहाणं अशा कृती करायला लावल्या. झोपेपासून वंचित ठेवलेल्या एका गटाला अधिक प्रथिनं व जीवनसत्त्व असलेलं पौष्टीक पेय देण्यात आलं तर दुसºया गटाला प्लासिबो पेय देण्यात आलं. प्लासिबो पेय हे पौष्टिक पेयासारखं दिसत असलं आणि चवही तशीच असली तरी त्यात कोणातेही पौष्टिक घटक नव्हते. या सर्व प्रयोगातून झोपेचा जखम भरण्यासाठी फायदा झाल्याचे स्पष्ट दिसून आले.
ज्या लोकांना पुरेशी झोप मिळाली त्यांची झोप ४.२ दिवसात भरून आली तर झोप न मिळालेल्या रुग्णांसाठी ५ दिवसांचा अवधी लागला. पौषणमुल्यांचा जखम भरण्यासाठी थेट उपयोग झाला नसल्याचे दिसून आले. ज्या लोकांनी पौष्टीक पेय प्यायले होते त्यांच्या जखमांमधील द्रावाची चाचणी केल्यावर जखमेशी लढाई करण्यासाठी त्यांच्या शरीराने चांगली तयारी केल्याचे दिसले मात्र जखम भरुन येण्याची गती वाढल्याचे त्यात दिसले नाही. असा अहवाल स्मिथ यांनी जर्नल आॅफ फिजिओलॉजीमध्ये लिहिलेल्या निबंधात मांडला आहे. कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफर्ड युनिव्हसिर्टा मेडिकल सेंटरमध्ये निद्रातज्ज्ञ असणाऱ्या क्लेट कुशिदा यांनी झोप न मिळाल्यास रोगप्रतिकारक क्षमतेवर परिणाम होतो आणि नंतर जखम भरून येण्यावर परिणाम होतो असे सांगितले. त्यामुळे या प्रयोगातून दिसलेले निरीक्षण अत्यंत योग्य असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले आहे.