-अमृता कदमपावसानं मध्यंतरी घेतलेली सुट्टी कदाचित आता संपत आल्याची चिन्हं वातावरणात दिसता आहेत. पण जूनमध्ये झालेल्या दमदार पावसाच्या जोरावर निसर्ग मात्र हिरवागार झाला आहे. संपूर्ण सृष्टीतून एक चैतन्याचा प्रवाह वाहू लागला आहे. अशा वातावरणात हातातली कामं थोडी बाजूला ठेवून हिरव्यागार झालेल्या या सृष्टीशी काही क्षण का होइना पण एकरूप व्हायला कोणाला आवडणार नाही बरं?
पावसाळ्यात खरी मजा शहरांपेक्षा गावखेड्यातच. विकासाची आणि प्रगतीची कितीतरी साधनं शहरांमध्ये असली तरी निसर्गाची समृध्दी आणि विशेषत: पावसाळ्यातली मजा ही गावातच. आता मान्सून ट्रीपसाठी वाट वाकडी करून आडवळणाच्या गावाला जायचं ठरवलं तरी राहण्याची खाण्याची आबाळ होत नाही. कारण पावसाळ्याच्या काळात लोकांना सहलीला जायला आणि विशेषत: शहरं सोडून गाव खेड्यात जायला आवडतं हे आता हॉटेल्स आणि टूर आॅपरेटर्स यांनाही चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे राहण्या खाण्याची सोय सहज होऊ शकते तसेच जास्तीत जास्त लोकांनी सहलीसाठी बाहेर पडावं यासाठी हॉटेल्स आणि टूर आॅपरेटर्सच्या आॅफरही जोऱ्यात असतात. तेव्हा पावसाळ्यातली छोटी मोठी ट्रीप् प्लॅन करायला खरंतर काहीच हरकत नाही. उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायचा प्लॅन या ना त्या कारणानं फिसकटला असेल त्यांच्यासाठी तर पावसाळ्याच्या काळातल्या या छोट्या सहली म्हणजे सुवर्णसंधी आहे. कारण यंदाच्या पावसाळ्यात प्रवासी कंपन्यांनी आपले दर 15 ते 20 टक्क्यांनी घटवले आहेत.
आयुर्वेदानं नवचेतनेसाठीच्या उपचारपद्धतींसाठी पावसाळा हा सर्वात उत्तम काळ सांगितला आहे. कारण या दिवसांत हवा शुद्ध, पुरेशी दमट आणि गार असते. कदाचित याच कारणामुळे आरोग्याविषयी जागरु क मंडळींची पावलं या दिवसात मोठ्या प्रमाणावर हिमाचल प्रदेश, केरळच्या दिशेनं वळतात. वायनाड, मुन्नार( केरळ), गोवा, लेह-लडाख, महाराष्ट्रातली माथेरान, महाबळेश्वर, कोकण ही ठिकाणं, कुर्ग( कर्नाटक), स्पिती व्हॅली( हिमाचल प्रदेश), शिलॉँग ( मेघालय), दार्जिलिंग ( प.बंगाल), कोडाईकॅनाल (तामिळनाडू), राणीखेत ( उत्तराखंड) ही ठिकाणंदेखील पावसाळ्यातल्या पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. पावसाळ्यात प्रवाशांची गर्दी कमी असल्यानं विमान कंपन्यांच्या घसघशीत आॅफरही सुरु आहेत. इंडिगोसारख्या विमान कंपनीनं खास पावसाळ्यासाठी सवलत जाहीर केली आहे. याशिवाय ीं२८ॅङ्म1.ूङ्मे सारख्या काही ट्रॅव्हल वेबसाईटनं 1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंतच्या काळात ठराविक हॉटेलमधल्या बुकिंगसाठी 20 पासून अगदी 70 टक्क्यांपर्यंतच्या सवलती जाहीर केल्या आहेत.
पावसाळ्यातल्या पर्यटनाचा ट्रेण्ड पाहिला तर अगदी दोन दिवसांच्या छोट्या वीकएण्ड टूर जास्त लोकप्रिय आहेत. या टूरमध्ये ट्रेकिंग, धबधब्यांची सैर, जंगलात रात्रीची सैर, कॅम्पिंग अशा गोष्टी लोकांच्या पसंतीक्रमवारीत सर्वांत अग्रभागी असतात. धबधब्यांमधे गोव्याचा दुधसागर धबधबा, केरळचा अथिरापल्ली आणि चेरापुंजीमधला नोहकालिकाय धबधबा या ठिकाणी सर्वात जास्त पर्यटक भेट देत असतात.
पावसाळ्यात लॉन्ग राईडनं पोहचता येईल अशी शहरं निवडण्याकडे लोकांचा अधिक कल असतो. मुंबई ते गोवा, चेन्नई ते पुद्दुचेरी, बंगळुरू ते कुर्ग, शिलॉंग ते चेरापुंजी, दार्जिलिंग ते गंगटोक ही त्यातली सर्वाधिक प्रसिद्ध नावं. प्रवासात वाटेल तिथे थांबत, अंगावर पाऊस झेलत, कधी गार हवेच्या झोक्यांसह वाफाळलेल्या चहाचे घुटके घेत या रस्त्यांची सफर करणं याच्याइतकं रोमँण्टिक अजून काय असू शकतं?
रस्ते, रेल्वे सुविधेचं जाळं अगदी छोट्या शहरांपर्यंतही पोहचल्यानं अशी नवनवी पावसाळी ठिकाणं शोधण्यात लोकांचा रस वाढतोय. गोवा, केरळ आजही पावसाळ्यातल्या टूरसाठी अगदी टॉपवरच असले तरी बेकाल, हंपीसारख्या काही नव्या ठिकाणांचाही या यादीत समावेश होतोय. त्यामुळे पाऊस केवळ खिडकीतूनच न बघता, यंदा मस्त भिजायला, मन चिंब चिंब करायला नक्की बाहेर पडा. परत याल तेव्हा नवं काही मनात रु जल्याचं तुम्हालाही नक्की जाणवेल!