नवी दिल्ली : वयाच्या १३ व्या वर्षाच्या अगोदरच मासिक पाळी सुरू झालेल्या मुलींना मध्यम वयातच मधुमेहाचा धोका वाढत असल्याचे समोर आले. ब्रिटिश मेडिकल नियतकालिक (बीएमजे) ‘न्यूट्रिशन, प्रिव्हेन्शन अँड हेल्थ’मध्ये प्रकाशित झालेल्या अमेरिकन संशोधनात याबाबत माहिती देण्यात आली आहे. संशोधनानुसार, विशेषत: ज्यांना वयाच्या १० वर्षांपूर्वीच मासिक पाळी सुरू होते, त्यांना ६५ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी मधुमेह, तसेच हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. संशोधनात २० ते ६५ वर्षे वयोगटातील १७ हजार महिलांचा समावेश होता.
हार्ट अटॅकचा धोका दुप्पट१० वर्षांपूर्वी मासिक पाळी आल्याने ६५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या ज्या स्त्रियांना कमी वयात मधुमेह होतो त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका दुपटीने वाढतो. हे प्रमाण ६० टक्के इतके अधिक असते, असेही संशोधनात समोर आले आहे.
नेमका संबंध काय याची कारणे मिळेनात
अमेरिकेतील टुलेन युनिव्हर्सिटी आणि ब्रिघम अँड वूमेन्स हॉस्पिटलच्या संशोधकांनी सांगितले की, प्रायोगिक अभ्यास असल्याने त्यांना मासिक पाळीचा मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यामागील कारणे शोधता आली नाहीत.
अभ्यासात सहभागी झालेल्या महिला राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य आणि पोषण परीक्षा सर्वेक्षण १९९९-२०१८ मधून आल्या होत्या. संशोधनातील महिलांनी त्यांची पहिली मासिक पाळी कोणत्या वयात सुरू झाली हे त्यात नमूद केले होते.
१० वर्षे किंवा त्यापूर्वी मासिक पाळी सुरू झालेल्या ३२ % महिलांना टाइप २ मधुमेह होता. ११ व्या वर्षी मासिक पाळी आलेल्या १४ % महिलांना टाइप २ मधुमेह होता. १२ व्या वर्षी मासिक पाळी सुरू झालेल्या २९ % महिलांना टाइप २ मधुमेह होता.