- मयूर पठाडे
आपलं बाळ गुटगुटित दिसावं असं प्रत्येक आईला वाटत असतं. पण त्यसाठी काहीही करायची त्यांची तयारी असते. अगदी लवकरात लवकर बाळाला अंगावर पाजणं बंद करून बाहेरचं दूध किंवा इतर पदार्थ बाळाला देणंही सुरू केलं जातं. अर्थात यामागे ‘फिगर कॉन्शसनेस’चं प्रमाणही खूप मोठं आहे.
अनेक आया तर आपलं बाळ वर्षाचं होण्याच्या आत, बर्याचदा तर चार-सहा महिन्यांचं असतानाच त्याला फ्रूट ज्यूस देणंही सुरू करतात. कारण फळं आरोग्याला चांगली असतात हा एक समज. अर्थात हा समज बरोबरच आहे, पण इतक्या लहान बाळांना फ्रुट ज्यूस देणं चुकीचंच आहे.
शास्त्रज्ञांनीही आता जगभरातल्या आयांना सावधानतेचा इशारा देताना सल्ला दिला आहे की, कृपया आपल्या बाळाला, ते किमान वर्षाचं होईपर्यंत तरी त्याला फ्रूट ज्यूस देऊ नका. नाहीतर आपल्या बाळाच्या वाढीवर त्याचा दुष्परिणाम होईल.
वयाच्या पहिल्या सहा महिन्यापर्यंत तर चुकूनही बाळाला फ्रूट ज्यूस देऊ नका. अगदी दिलंच तर सकाळी पहिल्यांदा बाळाला आईचंच दूध मिळालेलं असायला हवं. कारण या वयातल्या बाळांसाठी आईचं दूध हेच सर्वोत्तम असतं. त्यात बाळाच्या वाढीसाठी भरपूर पौष्टिक पदार्थ असतात.
बाळांना फ्रूट ज्यूस का देऊ नये?
1- फूट्र ज्यूस हे आईच्या दुधाला कधीच पर्याय असू शकत नाही.
2- फूट्र ज्यूसमध्ये मोठय़ा प्रमाणावर साखर असते.
3- लहान वयातच या अतिरिक्त साखरेमुळे बाळाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो.
4- या साखरेचाच परिणाम म्हणून कदाचित तुमचं बाळ गुटगुटित दिसेलही, पण ते ‘फोफसं’ असेल. दिसायला छान मस्त, हेल्दी, पण शरीर मात्र कमजोर.
5- लहानपणी घेतलेल्या फूट्र ज्यूसमुळे मोठेपणी मुलांच्या दात किडलेले असू शकतात किंवा ते लवकर किडण्याची प्रवृत्ती खूप मोठय़ा प्रमाणात वाढते.
6- फूट्र ज्यूसमुळे मुलांचं वजनही भराभर वाढू शकतं.
त्यामुळे आपण जर आपल्या बाळाला फूट्र ज्यूस देत असाल, तर थांबा आणि आईच्या दुधाचाच जास्तीत जास्त वापर करा.