प्रज्ञा म्हात्रे । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : उन्हाळा वाढल्याने डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेकवेळा फुटपाथवरील गॉगल घेतला जातो. हा गॉगल डोळ्यांसाठी घातक ठरतो. असा गाॅगल वापरू नये, असा सल्ला नेत्ररोगतज्ज्ञांकडून दिला जातो. डोळे हा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. त्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. त्वचेची काळजी घेण्यासाठी कटाक्षाने पथ्य पाळली जातात. उष्ण हवामानाला अनुसरून आहार घेण्याकडे लक्ष दिले जाते. मात्र, उन्हाळ्यात डोळ्यांचे रक्षण करण्याच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण दुर्लक्ष करतो.
डोळे सर्वात नाजूक अवयवडोळे हा सर्वात नाजूक अवयव आहे. उन्हाळ्यात डोळ्यांमध्ये शुष्कपणा येतो. उन्हाळ्यात फिरत असताना डोळ्यांत धूळ खूप जाते आणि धुळीमुळे डोळ्यांना ॲलर्जी होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात हवा कोरडी असल्याने धूळ जाते.
गॉगल घेताना काय काळजी घ्याल?n अतिनील किरणांपासून संरक्षण करणारा (यूव्ही प्रोटेक्टेड) गॉगल वापरला पाहिजे. फुटपाथवरील गॉगल डोळ्यांसाठी सुरक्षित नाही.
जास्तीचे ऊन डोळ्यांसाठी हानिकारकजास्तीचे ऊन, अतिनील किरणे डोळ्यांसाठी घातक आहेत. उन्हाळ्याच्या दरम्यान सूर्यप्रकाशाशी आणि अतिरिक्त उष्णतेशी संपर्क आल्याने डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो. त्यामुळे डोळ्यांतील टिअर फिल्मचे प्रमाण कमी होते.
उन्हात जास्त फिरू नये. उन्हात बाहेर जायचे असेल तर सनग्लासेस आणि टोपी वापरावी. दुपारी १२ ते ३ यावेळेत बाहेर फिरणे टाळावे. यावेळी उन्हात फिरल्यास उष्माघाताचा फटका बसतो.
उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल?
फुटपाथवरील गॉगलमुळे डोळ्यांना निश्चितच त्रास होतो. या गॉगलची काच ही नुसती काळी असते. ती काच यूव्ही प्रोटेक्टेड नसल्याने उन्हापासून संरक्षण करू शकत नाही. यूव्ही सर्टिफिकेट असलेले गॉगलच घ्यावेत. थोडक्यात ब्रँडेड गॉगल वापरावा. उन्हामुळे डोळे लाल होतात. एका दिवसात डोळ्यांवर परिणाम होत नसला, तरी धूळ खूप असल्याने सतत उन्हात फिरल्यास दोन-तीन दिवसांनी डोळ्यांना त्रास हाेताे. यूव्ही प्रोटेक्टेड गॉगलमुळे डोळ्यांना गारवाही मिळतो. - डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, नेत्ररोगतज्ज्ञ, सिव्हिल हॉस्पिटल