नवी दिल्ली : गुळवेल ही वनस्पती मानवी शरीरातील कुठल्याही अवयवासाठी हानिकारक नसल्याचा निर्वाळा युरोपातील प्रसिद्ध औषधविषयक नियतकालिक ‘फ्रंटियर्स इन फार्मालॉजी’ने दिला असल्याची माहिती पतंजली आयुर्वेदच्या वतीने देण्यात आली आहे.
गुळवेला हिंदीत गिलोय अथवा गुडुची म्हटले जाते. पतंजलीच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पतंजली संशाेधन संस्थेने जगात पहिल्यांदा गुळवेलावर संशोधन केले. यात ७० पेक्षा अधिक नर व मादी उंदरांवर प्रयोग करण्यात आले.
या उंदरांचे यकृत, मुत्रपिंडे, थायरॉईड ग्रंथी, हृदय, लिपिड यांचा जैवरासायनिक प्रोफाईल तपासण्यात आला. त्यात कोणताही प्रतिकूल परिणाम आढळला नाही. या सर्व तपासण्या जीएलपी गाईड लाईन्स अनुसार करण्यात आल्या, असे पतंजलीने म्हटले आहे. (वा. प्र.)