- डॉ. अभिजित देशपांडे
भयावह स्वप्ने पडून रात्री-बेरात्री उठून शरीराला इजा करून घेण्याबाबत गेल्या लेखात आपण वाचले. आपला कोणीतरी पाठलाग करत आहे; अथवा धमकी देत आहे, अशा तऱ्हेची पॅरनॉइड स्वप्ने पडतात आणि शरीरावर ताबा नसलेली व्यक्ती धडपडते. आनंदाची बातमी म्हणजे या स्वप्न विकारावरदेखील उपाय आहेत!
निद्राविकारतज्ज्ञांकडून तपासून घेणे ही पहिली पायरी. पॉलिसोम्नोग्राम हा रात्रीची झोप अभ्यासण्याचा सगळ्यात उत्तम (गोल्डस्टँडर्ड) मार्ग. त्यानंतर आढळलेल्या प्रत्येक कारणावर उपाय करता येतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अशा व्यक्तींनी उंच खाटेवर न झोपता जमिनीवर बिछाना अंथरावा. आजूबाजूस काचेच्या अथवा धातूंच्या वस्तू ठेवू नयेत. रात्री मद्यपान करणे टाळावे.
अशा स्वप्नावस्थेत घडणाऱ्या प्रसंगांचा वापर काही गुन्हेगार मंडळी कोर्टात बचावासाठी करू शकतात. १९८४ मध्ये घडलेली सत्य घटना. डेनव्हर शहरातील एका सर्जनने रात्री आपल्या बायकोची हत्या केली. तिच्या देहाचे तुकडे करून गोणीत भरले आणि स्विमिंग पुलाच्या जवळ असलेल्या खोलीत ती गोणी ठेवली. कोर्टामध्ये त्याने आपल्याला आर.बी.डी. (म्हणजे रेमरीलेटेड बिहेवीअर्स डिसऑर्डर) असल्याचा दावा केला. आपण हे कृत्य जागेपणी केले नसल्याने निर्दोष असल्याचे त्याचे म्हणणे होते.
सरकारतर्फे निद्रातज्ज्ञांनी उत्तम तपासणी करून (पॉलिसोम्नोग्राम) त्यांच्या दाव्यातील फोलपणा सिद्ध केला. आर.ई.एम. (स्वप्न झोप) आणि पुरुष लिंगाचे आपोआप होणारे उद्दीपन यांचा महत्त्वाचा संबंध आहे. साधारणपणे वयाच्या तिसऱ्या वर्षापासून झोपेमध्ये लहान मुलांचे लिंग ताठर होणे तुरळकपणे दिसू लागते. पौगंडावस्थेत त्याचे प्रमाण वाढते. याचा लैंगिकभावनेशी संबंध असेलच असे काही नाही; पण ज्यांना इरेक्टाइल डिसफंक्शनचा त्रास होतो आहे, त्यांच्याकरिता स्वप्न झोपेत होणारे हे बदल महत्त्वाचे ठरतात.
काही औषधांमुळे (उदा. मानसिक आजारांवर काम करणारी काही अँटिडिप्रेसंट) रेम झोपेवर परिणाम होतो आणि इरेक्टाइल डिसफंक्शनचा त्रास उद्भवतो. बऱ्याच वेळेला इरेक्टाइल डिसफंक्शनचा त्रास हा शारीरिक नसून मानसिक असतो. रात्रीच्या उत्तरार्धात रेम झोप जास्त असते, याचा उल्लेख अगोदर केलेलाच आहे. म्हणूनच रात्रीऐवजी पहाटे कामक्रीडेची वेळ उत्तम ठरते.