- डॉ. अभिजित देशपांडे
अनेक वाचकांनी मला विचारले आहे, “इतकी वर्षे मी घोरतो, अजून तरी काही विशेष प्रॉब्लेम जाणवलेला नाही. मी कशाला काळजी करू?” - एक साधा विचार करा : मी गेली अनेक वर्षं आजूबाजूला न पाहता रस्ता क्रॉस करतो, एकदाही ॲक्सिडेंट झाला नाही; पण म्हणजे मी कायम असेच वागावे का? शहाण्या माणसाने अपघात टाळण्याच्या प्रयत्न करावा. निद्रेतील विकार हे गाढ झोपेत असल्यामुळे सहजपणे ओळखले जात नाहीत, मग त्यांची सवय होते, त्यामुळे येणारा निरुत्साह / थकवा हा अंगवळणी पडून जातो.दिनेश चव्हाण आणि त्यांची पत्नी यांचा अनुभव पाहा : झोप लागायला प्रॉब्लेम येतो, गाढ झोपेतून जाग येते आणि परत झोपण्यास वेळ लागतो, ही दिनेशची तक्रार होती. त्याची पत्नी सांगत होती, दिनेश अगदी मस्त झोपतो; कारण त्याच्या घोरण्यामुळे तिलाच कधी कधी जाग येते! आता काय करावे? - तर तपासण्या!‘पॉलीसोम्नोग्राफी’ या पद्धतीने दिनेशचा मेंदू किती वेळेला त्याला उठवत होता याचे मापन केले. त्याचा मेंदू झोपला की लगेच घशाचे स्नायू शिथिल व्हायचे आणि परिणती घोरण्यात व्हायची. श्वास नलिकेतील अडथळा वाढला, की छातीच्या स्नायूंना श्वास घ्यायला त्रास व्हायचा. एका विशिष्ट मर्यादेनंतर दिनेशचा मेंदू त्याला उठवायचा निर्णय घ्यायचा. थोडीशी जागृत अवस्था आल्यावर आपोआपच स्नायूंचा अडथळा कमी व्हायचा आणि मेंदू परत झोपेच्या अधीन व्हायचा.हे चक्र दर तासाला वीस ते पंचवीस वेळेला होत होते! अशा रीतीने ओरबाडून उठवल्यामुळे शरीरात ॲड्रेनलीनचा स्राव होतो. त्यामुळे हदयाची धडधड वाढते. काही जणांना झोपेमध्ये पॅनिक अटॅक्स येतात. त्याचे मूळ या ‘शारीरिक’ कारणात असू शकते.- पण दिनेशला मुळातच झोप लागायला प्रॉब्लेम का होता? झोप लागल्यावरच माणसे घोरतात; मग घोरण्यामुळे झोप न येणे कसे शक्य आहे? त्याचे कारण - ‘असोसिएटेड लर्निंग’ म्हणजेच चुकीची होणारी जोडणी! घोरण्यामुळे येणारी जाग आणि पलंगावर पडलेले असणे यांची वारंवार जोडणी झाली की हळूहळू जाग म्हणजे पलंगावर पडणे असे असोसिएशन होते. त्याचा क्रम उलटा झाला की पलंगावर पडणे म्हणजे जाग अशी चुकीची जोडणी होते. निद्रानाशावरील पुढील लेखांमध्ये याबद्दल सविस्तर माहिती येईलच.
prasad.tamhankar@gmail.com