च्युइंगम चघळण्याची सवय अनेकांना असते. काहीजण तर सतत च्युइंगम चघळत राहतात. लहान मुलांना त्याची अकाली सवय लागते. जाहिरातींचा मारा केला जातो. तरुण मुलामुलींना ते खाणं हे स्टाइल स्टेटमेण्ट वाटतं. काहींना कामाचा, अभ्यासाचा इतका स्ट्रेस येतो की ते सतत च्युइंगम चघळत असतात. इथं तिथं थुंकतात. चिकटवूनही टाकतात.
खरं तर सतत च्युइंगम चघळणं हे त्यातील साखर आणि प्रिझव्हेंटिव्ह, कृत्रिम रंग या घटकांमुळे आरोग्यास अपायकारक असतं. पण च्युइंगम गिळणं हे आरोग्यास अधिक हानिकारक आणि धोकादायक असतं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 'अमेरिकन सॅपोडिला' नावाच्या झाडाच्या चिकट रसापासून च्युइंगम तयार केलं जायचं. आता त्यात पॉलिमर्स, प्लॅस्टिसाइझर्स आणि रेझिन्स या घटकांचा समावेश केलेला असतो. या घटकांशिवाय पिझर्वेटिव्ह, गोडवा आणणारे घटक, कृत्रिम रंग आणि चव यांचा समावेश केलेला असतो. च्युइंगमचा वरचा थर चघळताना मजा येते. तो सतत चघळत आणि चावत राहण्यास उत्तेजन देतो. च्युइंगम चघळण्याची विशिष्ट पद्धत असते. च्युइंगम चघळायचंच असतं, ते गिळायचं नसतं. त्यामुळे लहान मुलांना चांगली समज येईपर्यंत ते खायला देऊ नये असं तज्ज्ञ सांगतात.
चुकून गिळलंच तर?
१. चुकून च्युइंगम गिळलं गेलं तर लगेच मोठं अघटित घडत नाही. त्यामुळे लगेच घाबरून जाण्याची गरज नाही. च्युइंगम गिळलं गेल्यास आपल्या पचन व्यवस्थेवर विश्वास ठेवावा. आपली पचन व्यवस्था पचणाऱ्या गोष्टी पचवून, न पचणाऱ्या गोष्टी पुढे पाठवून बाहेर टाकण्यास मदत करत असते. च्युइंगममधील न पचलेलं गम हे शरीराच्या बाहेर सात दिवसांच्या आत टाकलं जातं. च्युइंगम गिळल्यानंतर ते आतड्यांना सात वर्ष चिकटून राहातं हा केवळ गैरसमज असल्याचं तज्ज्ञ आणि अभ्यासक सांगतात.
२. लहान मुलांनी एकापेक्षा अनेक वेळा च्युइंगम गिळल्यास ते आतड्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण करतं. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो. ओटीपोटात खूप दुखणं, बद्धकोष्ठता होणं, सतत गॅसेस होणं, डायरिया होणं, तोंड येणं ही लक्षणं आढळल्यास आणि च्युइंगम चघळण्याची सवय असल्यास डॉक्टरांकडे त्वरित जाऊन तपासणी करावी..