मुंबई : बहुतांश नागरिकांना झोपेत स्वप्न पडत असतात. काही नागरिकांना चांगली स्वप्ने पडतात, तर काहींना वाईट स्वप्ने पडत असतात. काही व्यक्तींना क्वचित कधी तरी स्वप्न पडतात. तर काही व्यक्तींना अनेकवेळा ही स्वप्ने पडत असतात. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, जर सातत्याने अशा पद्धतीने वाईट स्वप्ने पडत असतील तर त्यांनी मानसोपचारतज्ज्ञांची गरज आहे. ही स्वप्ने नक्कीच का पडतात? या प्रश्नाचे उत्तर शोधून काढून त्यावर उपचार होणे गरजेचे आहे. त्यावर आजार आहे की नाही, हे निश्चित निदान करणे होणे महत्त्वाचे आहे. वारंवार वाईट स्वप्ने पडणे नक्कीच काळजीचे कारण आहे.
यावर उपाय काय? कुठल्याही गोष्टीची अतिकाळजी करू नये. व्यसनांपासून दूर राहावे. संतुलित आहार करावा. झोपेची निश्चित वेळ ठरवावी, त्यानुसार झोपावे आणि सकाळी लवकर उठावे. प्राणायाम, योगासारखे प्रकार करावेत. मानसिक ताण-तणावाखाली असेल तर मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
हे आजाराचे लक्षण आहे का? एखाद्या व्यक्तीला क्वचित स्वप्न पडू शकते. मात्र, जर त्या व्यक्तीला वारंवार वाईट स्वप्ने पडत असतीलतर नक्कीच त्यांनी व्यावसायिक मदत घेणे गरजेचे आहे. मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घेऊन त्यांच्याकडून समुपदेशन करून घेणे महत्त्वाचे आहे. स्वप्नं का पडतात? याची कारणे शोधून काढणे गरजेचे आहे आणि त्यानुसार उपचार करावे लागतात. केवळ स्वप्नं पडतात हा आजार असू शकत नाही. त्याचाशी संबंधित अनेक गोष्टी असतात. त्या शोधून काढाव्या लागतात.
वाईट स्वप्न का पडतात?
या अशा पद्धतीची लक्षणे घेऊन नागरिक आमच्याकडे येत असतात. मात्र, आम्ही त्याला लगेच काही तरी आजार आहे असे लेबल लावत नाही. त्या व्यक्तीशी बोलून नेमकं हे कशामुळे होतंय, हे जाणून घेतो. त्यानंतर त्याला असणाऱ्या लक्षणांसाठी काही औषधोपचाराराची गरज असेल तर ती आम्ही करतो. वारंवार वाईट स्वप्नं पडत असतील तर नक्कीच काळजीचे कारण आहे. त्यावर वैद्यकीयशास्त्रात उपाय आहेत. - डॉ. सारिका दक्षीकर, मानसोपचारतज्ज्ञ, जी.टी.हॉस्पिटल