- मयूर पठाडेएक्सरसाइज न करण्यासाठी आपण किती कारणं सांगतो.. मला वेळ नाही, आजकालच्या जिम फारच महागड्या आहेत. मला रोज जायला तर मिळणारच नाही, मग एवढी फी कशासाठी भरायची? माझ्या घराजवळ कुठलीच जिम नाही.. याशिवाय आणखी एक महत्त्वाचं कारण बऱ्याचदा ऐकायला मिळतं, मला इतकी कामं आहेत, इतकी टेन्शन्स आहेत, या टेन्शनमध्ये कसला व्यायाम होणार? व्यायाम करायचा तर माणूस टेन्शन फ्री हवा, त्याला थोडा रिकामा वेळ हवा...पण खरंतर ज्या कारणानं आपण व्यायाम करणं टाळतो, त्याच कारणासाठी व्यायामाचा जास्तीत जास्त फायदा होतो. त्यामुळे व्यायाम न करण्याचं कोणतं कारणच उरत नाही.
शिवाय व्यायाम सुरू करण्यासाठी मुळात कुठल्याही साधनांची आवश्यकताच लागत नाही. त्यासाठी पैसेही लागत नाहीत. अगदी घरातल्या घरात किंवा नुसतं घराबाहेर पडलं तरी आपल्या व्यायामाला सुरुवात होऊ शकते. आपल्यातल्या एनर्जीला योग्य वाट देण्यासाठी एक्सरसाइज खूपच महत्त्वाचा ठरतो. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी, नव्यानंच व्यायाम करणाऱ्यांना बऱ्याचदा सारखं सारखं तेच करून कंटाळा येतो. त्यामुळे एक्सरसाइजच्या शेड्यूलमध्ये भिन्नता असली पाहिजे. कधी इनडोअर, कधी आऊटडोअर, कधी वेट ट्रेनिंग, कधी सायकलिंग.. किंवा अगदी तोच व्यायाम करीत असला तर त्याचा क्रम बदलला तरी कंटाळा जातो. आठवड्याचे जास्तीत जास्त दिवस रोज किमान तीस मिनिटं तरी व्यायाम प्रत्येकानं केलाच पाहिजे. काय आहेत एक्सरसाइजचे फायदे?
१- मुख्य म्हणजे व्यायाम केल्यानं आपलं टेन्शन कमी होतं. २- मसल्स रिलॅक्स होतात. ३- झोप व्यवस्थित लागते. ४- भविष्यातली आव्हानं आणि टेन्शन्स घेण्यासाठी आपण सज्ज होतो. ५- टेन्शन्स घेण्याची आपली क्षमता वाढते.६- आपलं आरोग्य सुधारतं. ७- चिंत, नैराश्य या गोष्टी आपल्यापासून दूर पळतात.८- ब्लड प्रेशर योग्य प्रमाणात राहाण्यास मदत होते.९- हृदयविकाराचा धोका कमी होतो.१०- डायबेटिससारखे आजार लांब राहातात. अगोदरच हा आजार असेल तर तो आटोक्यात राहातो.११- पाठीचं दुखणं मागे लागत नाही. आधीच हे दुखणं असेल तर त्यावर निश्चित आराम पडतो..