ठाणे : कोरोनाच्या काळातील अनुभवांमुळे मानसिकदृष्ट्या रुग्ण खचून गेलेल्या रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी तसेच त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी या पोस्ट कोविड सेंटरमध्ये मानसोपचारतज्ज्ञाची नियुक्ती केली आहे.
कोरोनानंतर जाणवणारा थकवा, बैचेनी, अनाहूत अस्वस्थता, लक्ष केंद्रित न होणे, लवकर काही न आठवणे अशा अनेक कारणांनी रुग्ण त्रस्त झालेले असतात. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम झालेला असतो. त्यामुळेच कोरोनानंतर आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यासाठी या पोस्ट कोविड सेंटरमध्ये समुपदेशन केंद्र उभारले असून मानसोपचारतज्ज्ञाच्या सुयोग्य मार्गदर्शनाने रुग्णांना मानसिकदृष्ट्या सक्षम केले जाणार आहे.
आहारतज्ज्ञकोरोनामुळे आपल्या दैनंदिन आहारात मोठा बदल झालेला असतो. शरीरामध्ये प्रचंड थकवा जाणवत असतो. अशावेळी शरीरात ऊर्जा कशी वाढवावी, यासाठी समतोल आणि सकस आहार कोणता घ्यावा, कसा घ्यावा, याचे मार्गदर्शन करण्यासाठी या सेंटरमध्ये आहारतज्ज्ञाची नेमणूक केली आहे.ते रुग्णांना दैनंदिन आहाराबद्दल मार्गदर्शन करणार आहेत.
वैद्यकीय कक्षकोरोनानंतर जाणवणारी लक्षणे म्हणजे कमी उत्साह आणि थकवा, श्वास घेण्यास त्रास, छाती भरून येणे, सतत येणारा खोकला, कफ पडणे, तोंडाला चव न येणे, अपचन, डोकेदुखी, बेचैनी वाढणे, झोप न लागणे, परत कोरोना होईल याची भीती वाटणे, या सर्व गोष्टींचा सामना करण्यासाठी या सेंटरमध्ये वैद्यकीय कक्ष उभारला असून वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत या सर्व गोष्टींवर उपचार केले जाणार आहे.
फिजिओथेरपी कक्षकोरोनानंतर रुग्णांचे अवयव आणि स्रायू कमकुवत बनलेले असतात. त्यांना मजबूत करण्यासाठी कोणते व्यायाम करण्याची आवश्यकता आहे, याचे मार्गदर्शन करण्यासाठी या सेंटरमध्ये फिजिओथेरपिस्टची नियुक्ती केली आहे, असे सांगण्यात आले.
योगा सेंटरकोरोनाकाळात रुग्णांच्या शारीरिक आरोग्यावरदेखील मोठा परिणाम झालेला आढळतो. त्यामुळे रुग्णांनी योग्य व्यायाम करून शारीरिक आरोग्य योग्य राखले पाहिजे, यासाठी कोणता व्यायाम केला पाहिजे, श्वसनाचे व्यायाम, मध्यम व्यायाम आदींबाबत रुग्णांना योगा सेंटरमध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे.