HEALTH : आयुर्वेदासंगे निरोगी तारुण्य...!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2017 1:12 PM
ऐन तरुणाईत भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर आयुर्वेदीक उपचार पद्धती किती प्रभावी आहे, याबाबत आज जाणून घेऊया...!
-रवीन्द्र मोरे बदलत्या जीवनशैलीचा अनिष्ट परिणाम तरुणाईच्या आरोग्यावर झपाट्याने होत असून त्यातून सेलिब्रिटीदेखील सुटले नाहीत. गेल्या आठवड्यात बॉलिवूड अभिनेता इंदर कुमार आणि त्यांच्या पाठोपाठ कन्नड अभिनेता धु्रव शर्मा या तरुण अभिनेत्यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला. या अगोदरही अनेक तरुण कलाकारांचा मृत्यू हार्ट अटॅक आणि अन्य विकारांनी झाला आहे. नियमित व्यायाम, पौष्टिक आहार, रुटीन अॅडव्हान्स मेडिकल चेकअप आदी सर्व उपाय करुनही ऐन तारुण्यात जीवाला मुकावे लागते, हे वाचूनच धक्का बसतो. रोज घडत असलेल्या या घटनांमुळे आठवण येते ती आयुर्वेदीक उपचारांची. ऐन तरुणाईत भेडसावणाऱ्या या समस्यांवर आयुर्वेदीक उपचार पद्धती किती प्रभावी आहे, याबाबत आज जाणून घेऊया...!भारत देश सध्या एक तरुण देश आहे. भारतात तरुणांची सख्या सध्या सर्वात जास्त आहे. संपूर्ण जग भारताकडे उम्मेदिने बघते आहे. अशी स्थिती असतांनाच तरूणांच आरोग्य हा सुद्धा देशासमोर गंभीर मुद्दा आहे. असंसर्गजन्य व्याधी म्हणजे वाढलेले बिपी, डायबेटीस, लखवा, हार्मोनल विकार, डिप्रेशन, स्थौल्याता, इत्यादी अनेक विकार झपाट्याने वाढत आहेत. यामुळे तरुणांची कार्यक्षमता कमी होऊन देश प्रगतीवर अप्रत्यक्षपणे परिणाम होतो आहे. म्हणून तरुणांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण खूप गरजेच आहे. तरुणांमध्ये वाढत्या असंसर्गजन्य व्याधींचे मुख्य कारण म्हणजे व्यायामाचा अभाव, वाढते व्यसन, वाढते वजन, टेन्शन आणि डिप्रेशन हे आहेत. यासोबतच बदललेली जीवनशैली आणि आहारशैली हे सुद्धा आहेत. भारताची पारंपारिक चिकित्सापद्धती म्हणजे आयुर्वेद हे तरुणांच्या समस्यांचं समाधान अत्यंत प्रभावीपणे आज करीत आहे. आजच्या तरुणांची दिनचर्या, जीवनशैली व आहारशैली जाणून त्यांना त्यांच्या प्रकृतीनुसार योग्य अशी दिनचर्या, ऋतुचर्या व आहारविधीचे मार्गदर्शन आयुर्वेदीय चिकीत्साकांकडून केले जाते. दररोज केलेले अभ्यंग, व्यायम, स्नान, नस्य, इत्यादीचे पालन केल्यास बऱ्याच आजारापासून आपल्याला दूर ठेवते. यामुळे आपला दैनंदिन उत्साह टिकून राहतो. त्या-त्या ऋतूनुसार आपल्या आहारात आणि वागण्यात बदल केल्याने संपूर्ण वर्ष निरोगी राहून जगता येते. आयुवेर्दाची पंचकर्म चिकित्सा ही एक शरीरशुद्धी क्रिया आहे. शरीराची आभ्यंतर आणि बाह्यशुद्धी याद्वारे केली जाते. दर वर्षी ऋतूनुसार पंचकर्म करून घेतल्यास आपले तारुण्य व आरोग्य अधिक काळ टिकविता येते. आयुर्वेदाच्या काही चिकित्सा आहेत कि ज्या तरुण-तरुणींनी करून घेणे गरजेच आहे. मोबाईल, कॉम्पुटर स्क्रीन डोळ्यासमोर सतत राहिल्याने डोळ्यामध्ये रुक्षता येते, कमी वयातच चष्मा घालावा लागतो. जर आपण आयुवेर्दीय नेत्रतर्पण नियमित करून घेतले तर ह्या समस्यापासून नक्कीच दूर राहता येईल. तारुण्यात शैक्षणिक, आर्थिक व कौटुंबिक जवाबदारी वाढत असते. ह्यामुळे वाढलेला ताण-तणाव, नैराश्य आरोग्यवर परिणाम करते. यापासून बचाव करण्यासाठी वेळोवेळी आयुवेर्दीय शिरोधरा व नस्य करणे फायद्याचे ठरते. सध्याच्या काळात पुरुष व स्त्री वंध्यत्व याचे प्रमाण खूप वाढते आहे. टेस्ट ट्यूब बेबी, सरोगसी ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. तसेच तरुणींमध्ये मासिक पाळीच्या व ग्रंथीविकाराच्या समस्या वाढल्या आहेत. ह्यासाठी नस्य, वमन, विरेचन, बस्ती उपक्रम करणे उपयुक्त ठरतात. तारुण्यात प्रवेश केल्यावर मुल-मुली आरोग्यविषयी जेवढे सजग नसतात पण त्यांच्या सौंदर्याच्या बाबतीत अधिक सजग असतात. मी आकर्षक आणि सुंदर दिसावं असं प्रत्येक मुलामुलींना वाटत असते. सध्या अनेक तरुण-तरुणींना केस गाळणे, पांढरे होणे, टक्कल पडणे, पिंपल्स आदी समस्या भेडसावतात. आयुर्वेद सौंदर्य चिकित्सेच्या बाबतीत सुद्धा मागे नाही. केसांची, त्वचेची, चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन तर आयुर्वेद करतोच. सोबत आयुर्वेदाच्या सौंदर्यचिकित्सा सुद्धा फार प्रभावी आहेत. आयुर्वेद हा फक्त रोगी व्यक्तींसाठी नसून निरोगी व्यक्तींसाठी पण आहे. आपण आजारी नसतानांच आपल्या वैद्यांकडे जाऊन प्रकृती परिक्षण, सारपरिक्षण, नाडीपरिक्षण करून घेऊन योग्य तो आहार, दिनचर्या व पंचकर्म कुठले करायचे हे निश्चित करून घेतल्यास आपले तारुण्य नक्कीच निरोगी करू शकतो. डॉ. भूषण मनोहर देव (आयुर्वदाचार्य)(लेखक हे पंचकर्म तज्ञ व केशविकार तज्ञ आहेत)