बदलत्या जीवनशैलीत आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यात जर खाण्यात काही वेगळे पदार्थ आले तर पोटाच्या समस्या सुरू होतात अपचन, एसिडीटी, पोट साफ न होणे, पोट फुगल्यासारखं वाटणे, असा त्रास होतो. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे अनेक ठिकाणी स्थानिक दवाखाने सुद्धा बंद आहेत. त्यावेळी काही समस्या उद्भवल्यास गैरसोयीचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला एक सोपा घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायाचा वापर केल्यास तुम्हाला पोटाच्या समस्या उद्भवणार नाही. शिवाय वजन नियंत्रणात राहण्यास सुद्धा फायदेशीर ठरेल.
हिंगाच्या पाण्याचे असे करा सेवन
एक ग्लास पाणी गरम करून घ्या. हे पाणी गरम झाल्यानंतर त्यात हिंग घाला. हिंग पाण्यात चांगलं मिक्स झाल्यानंतर या पाण्याचे सेवन करा. महिलांसाठी तसंच पुरूषांसाठी सुद्धा हिंगाचं पाणी लाभदायक ठरतं. जाणून घ्या काय आहेत हिंगाच्या पाण्याचे फायदे.
ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं.
तुम्हाला ब्लडप्रेशरची समस्या असेल तर आहारात हिंगाचा समवेश करणं फायदेशीर ठरेल. कारण हिंगामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते. रक्तात गुठळ्या होत नाहीत ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत सुरू राहिल्यामुळे रक्तप्रवाह नियंत्रित राहण्यास मदत होते. लो ब्लडप्रेशर आणि हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता कमी होते.
पचनक्रिया व्यवस्थित राहते
पोट साफ होत नसेल तर झाल्यास हिंगात थोडं मीठ आणि चिमूटभर सोडा टाकून रात्री झोपण्यापूर्वी सेवन करावे. पोट साफ होते. पचनक्रिया चांगली राहते. खाल्लेल्या अन्नाचे पचन नीट झाल्यामुळे गॅस, पोट दुखीची समस्या उद्भवत नाही. वजन सुद्धा नियंत्रणात राहतं.
दातांच्या समस्येसाठी फायदेशीर
जर तुमच्या दातांमध्ये वेदना होत असतील तर एखादा बॅक्टेरिया तुमच्या दातांना त्रास देत आहे. हिंगामध्ये अनेक एंटीबॅक्टेरियल तत्व आढळून येतात. जे दातांना लागलेली किड दूर करण्यासाठी मदत करतात. एवढचं नव्हे तर दातांच्या वेदना दूर करण्यासाठीही हिंग परिणामकारक ठरतो. जर तुमचे दात दुखत असतील तर एक हिंगाचा तुकडा त्या दाताखाली ठेवा. त्यामुळे दाताचं दुखणं कमी होईल.
मासिक पाळीतील वेदना दूर होतात
मासिक पाळीतील वेदना, अति रक्तस्त्राव, अनियमित मासिक पाळी यावर हिंग फायदेशीर आहे. हिंगात असे घटक असतात ज्यामुळे महिलांच्या शरीरातील प्रोजेस्टेरॉन हार्मान्सचं प्रमाण वाढण्यास मदत होते आणि त्यामुळे अनियमित मासिक पाळीची समस्या दूर होते.
सर्दी, खोकला दूर होतो
सध्या कोरोना व्हायरसचं संक्रमण झपाट्याने होत असल्यामुळे सर्दी, खोकला झाला तरी लोक घाबरतात. म्हणून या लहानमोठ्या आजारांपासून लांब राहण्यासाठी हिंगाचे सेवन करा. वातावरणातील बदल आणि वाढणारे प्रदूषण याचा परिणाम शरीरावर होत असतो. ज्यामुळे अनेकांना वारंवार सर्दी-खोकला यासारखे संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागत असतो. हिंगाचा वापर करून त्यापासून सुटका मिळवू शकता. हिंग, मध आणि आल्याचा रस एकत्र करून त्याचे मिश्रण घेतल्याने तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती असून त्याबाबत आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)