पाणीपुरी हा तमाम खवय्यांचा अत्यंत लाडका पदार्थ. वाटाण्याचा रगडा, त्यावर चिंच-गूळ घालून केलेली खजूर चटणी आणि तिखट चवीच्या पाण्याने टम्म भरलेली पाणीपुरी पाहून भलेभले पाघळतात. घरी केलेली असेल किंवा भय्याकडची. पाणीपुरीचा आस्वाद घेणं हा एक वेगळाच आनंद असतो. पण, जिभेचे चोचले पुरवण्यासोबत पाणीपुरी खाणं हे तब्येतीसाठी देखील फायदेशीर ठरतं.
पाणीपुरीच्या सेवनाने वजन कमी करण्यासाठी पाणीपुरी फायदेशीर ठरू शकते. पाणीपुरी खाल्ल्याने तुमचं पोट भरलेलं राहतं. तुमची कॅलरीजची गरज भागते आणि बऱ्याच काळासाठी तुम्हाला पुन्हा भूक लागत नाही. पण, फक्त पाणीपुरी न खाता त्यासोबत थोडा व्यायाम आणि चालणं हे गरजेचं आहे.
पाणीपुरी खाल्ल्याने तोंड येण्याची समस्याही दूर होते. पाणीपुरीच्या पाण्यात असलेला जलजीरा आणि पुदीना यांमुळे तोंड येण्याची समस्या दूर होते. तसंच, पाणीपुरी खाल्ल्याने अॅसिडीटीचा त्रासही नियंत्रणात येतो. त्यासाठी पाणीपुरीच्या पाण्यात पुदीना, कैरी, सैंधव, मिरी, जिरेपूड आणि मीठ असं मिश्रण असणं गरजेचं आहे.
पाणीपुरीत नेहमीच्या मिठाऐवजी सैंधवाचा वापर केल्यास गॅसच्या समस्येपासूनही सुटका होते. तसंच पाणीपुरी खाल्ल्याने मूडही रिफ्रेश होतो. पचनक्रियेसाठीही मदत मिळते. पण, पाणीपुरी खाण्याने काही नुकसानही होऊ शकतं.
अस्वच्छ जागी किंवा अतिसेवनामुळे डायरिया, उल्टी, हगवण, अल्सर किंवा कावीळ होऊ शकते. पोटदुखीची समस्याही होऊ शकते. ज्यांना मीठ उपयुक्त नाही अशांना रक्तदाबाचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे पाणीपुरी शक्यतो घरी बनवावी. रव्याऐवजी पिठाच्या पुऱ्या खाव्यात. आतल्या सारणासाठी रगडा किंवा मूगच वापरावेत. तसंच ज्यांना लाल चटणी चालत नाही त्यांनी दह्याचा वापर करावा.