डॉ. नितीन पाटणकर (मधुमेहतज्ज्ञ)
आरोग्यतारा स्पर्धेदरम्यान संत्रे आणि भोपळी मिरची यांचा मुकाबला होता. संत्र्याने आपली बाजू छान मांडली. प्रेक्षक आणि परीक्षक दोघांनाही वाटत होते, 'आता बिचारी भोपळी मिरची काय करणार'. भोपळी मिरची स्टेजवर आली तेव्हा तिच्या वावरण्यात कुठेही भिती जाणवत नव्हती. तिने बोलायला चालू केले. तिने सुरुवात केली, परीक्षकांना नम्र विनंती आहे की मी अजिबात विनोदी बोलत नाही. कृपया माझ्या बोलण्यात कुठे विनोद वाटला तर एकदम जोरात हसू नका. पुढे ती म्हणाली, “आत्ताच संत्रेभाऊंनी त्यांच्यामुळे जे काही फायदे होतात हे सांगितले ते सर्व 'क' जीवनसत्वाची किमया आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्याकडे संत्रेभाऊंच्या तुलनेत तीन ते पाच पट जास्त ‘क’ जीवनसत्व असते. माझ्यामधील 'क' जीवनसत्व अशा खुबीने साठवले जाते की त्यातील आंबटपणा झाकला जातो त्यामुळे आंबट ज्यांना चालत नाही त्यांच्यासाठी मी ‘क’ जीवनसत्वाचा उत्तम स्रोत असते. हे बोलणे चालू असताना तीनही परीक्षक आपापल्या फोनमधून गुगलसर्च देऊन हे सर्व खरे आहे का हे शोधत होते.
भोपळी मिरची पुढे म्हणाली, दुसरा फायदा संत्रेभाऊंनी सांगितला तो म्हणजे त्यांच्याजवळील ‘अ’ जीवनसत्व वाढविणारी कॅरोटीन्स ही द्रव्य. त्यामुळे डोळ्याचे आरोग्य सुधारते. माझ्याकडे ही कॅरोटीन्सही भाऊंपेक्षा दोनपट जास्त उपलब्ध असतात. याहून जास्त महत्त्वाचे म्हणजे माझ्याकडे कॅप्सिनॉईड्स नावाचे पदार्थ असतात. हे म्हणजे माझ्या चुलत बहिणीत जे कॅप्सिसीन आढळते तसे कॅप्सिनॉईड्स. कॅप्सिसीनमुळे तिखटपण येते. पोटात गेल्यानंतर कॅप्सिसीन जे काम करते ती सर्व कामे कॅप्सिनॉईड्स करतात. पोटात गेल्यानंतर, इथे पुढे ती काही बोलणार इतक्यात तिचे लक्ष परीक्षकांकडे गेले. त्यांच्या चेहऱ्यावर अविश्वास दिसत होता आणि त्यांचे ठरलेले प्रश्न ओठांतून बाहेर पडायला उतावीळ होत होते. भोपळी मिरचीने ते बघून म्हटले, “आणि हो, मी लोकली ग्रो होते, माझी रसभाजी होते तशी पीठ पेरलेली पण भाजी होते. यांत पिठाऐवजी प्रोटीन वापरले तर माझी ‘हाय प्रोटीन, लो कार्ब, फायबरयुक्त, अँटीऑक्सिडंट्सने भरलेली भाजी बनते. हे ऐकून परीक्षक टाळ्या वाजवायला लागणार इतक्यात ती म्हणाली, “हे काहीच नाही, मला खाल्ल्याने, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यांवर ही उत्तम उपाय होऊ शकतात. कधीकधी मी थोडी तिखट असते पण माझ्या चुलतबहीणींसमोर मी नगण्य आहे. माझा तिखटपणा हा एकपट तर त्यांचा माझ्या तुलनेत अनेक पट जास्त. मला खाल्याने लोकांना काही प्रमाणात कॅन्सरपासून बचाव करता येतो.
मला खाल्ल्याने अल्सर होतो ही चुकीची समजूत आहे. काही जण तर माझ्यामुळे मूळव्याध होतो असेही मानतात ते पण चुकीचे आहे. अजून बोलायला भरपूर वेळ आणि भरपूर विषय होते पण इतक्यात संत्र उभे राहिले. त्याने पुढे येऊन मिरचीशी हस्तांदोलन केले. पुढे संत्रे म्हणाले, आज मी हरलो पण हरण्याचं दु:ख मोठं नाही, पण या मिरचीबाईंच्या गुणांची ओळख झाल्याचा आनंद त्यापेक्षा मोठा आहे.
स्पर्धा अशी असावी. विजेता स्पर्धा जिंकत असताना हरणारा मने जिंकून जावा.