- डॉ. नितीन पाटणकर (मधुमेहतज्ज्ञ)
माझा मित्र सुशोभन, स्वत:ला खवैय्या म्हणवतो. त्याला खरेतर खादाड हा शब्द शोभून दिसेल. बहुतेक खादाड लोकांना असेच वाटत असते की “आम्ही खवैय्ये आहोत”. त्याला आणखी एक वाईट सवय म्हणजे रस्त्यात उभे राहून गाडीवर जे दिसेल ते खायचं. त्यात ‘बैदा घोटाला, कच्छी डबल रोटी ते डाळंब डोसा, शाॅट पोहे ते सीताफळ आंबा’ सर्व काही आले’. त्यावर तो सांगतो की खाण्याच्या बाबतीत तो संतपदप्राप्त आहे. दर वेळेस असे काही बोलला की मी फक्त तोंड वेडेवाकडे करीत असे. एक दिवस असाच रस्त्यात सिताफळ खात होता. हात पूर्ण बरबटलेले. माझा चेहरा बघून म्हणाला, डॉक्या मी खाण्याच्या बाबतीत आता ‘ स्थितप्रज्ञ खवय्या’ झालो आहे. हे ऐकून मी त्याला म्हटले खरेच की, तू पु.लं.च्या ‘तुझे आहे तुजपाशी’ मधे काकाजींनी दाखवलेला स्थितप्रज्ञ झाला आहेस खरा. दोन दिवसांनी त्याने काकाजींचा स्थितप्रज्ञ म्हणजे काय हे कोणाकडून तरी समजावून घेतले आणि मला येऊन म्हणतो, पुन्हा मला काकाजींचा स्थितप्रज्ञ म्हणालास तर रायवळ अंब्यासारखा पिळून काढीन. हे बोलताना त्याला कलिंगडांची रास दिसली आणि मग स्वारी एकदम ‘हर हर महादेव’ च्या जोषात, कलिंगडांकडे वळली.
भैय्या एक कलिंगड ईधर खावे के लिये काटके देना. अंदर से एमदम लालभडक होना चाहिये. और बी एकदम कम होगा तो और अच्छा. पहिले एक चंद्रकोर साईझ का तुकडा निकालो. लालपन दिखाओ और फिर बाकी का काटो. एवढ दिव्य हिंदीत बोलून झाल्यावर तो कलिंगड वाला म्हणाला, “ साहेब आजकाल सगळी कलिंगड लालचुटुक असतात, बघायला लागत नाही. आणि साहेब मी मराठीच आहे, माझ्याशी मराठीत बोललात तरी चालेल. मग काय, त्याने एक मोठ कलिंगड कापले. सुशोभनने लगेच खायला सुरवात केली. खाता खाता तो म्हणाला, “ डाॅक्टर पूर्वीसारख आता त्रास नाही. हल्ली कलिंगड एकदम घट्टमुट्ट असतं. पूर्वी कसा फोड खाताना रस ओघळायचा, हल्ली कलिंगड पण ‘स्वच्छ भारत’ म्हणतात.
हे ऐकताना मला आठवले, जी फळे कॅल्शियम कार्बाईड वापरून पिकवतात ती भरीत असतात पण रसाळ नसतात आणि रंग येण्यासाठी चक्क कलिंगडाला इंजेक्शन देतात. कार्बाईड मुळे किडनी आणि लिव्हरला इजा होते. लालचुटुक कलिंगड दिसावे म्हणून त्यात लेड क्रोमेट नावाचे द्रव्य इंजेक्ट करतात त्यामुळे ॲनेमिया, स्मृती कमी होणे आणि डोळांना इजा होते.
याहून महत्त्वाचे म्हणजे कलिंगडाच्या पांढऱ्या दिसणाऱ्या सालीलगतच्या भागात सिट्रुलिन नावाचे द्रव्य मुबलक प्रमाणात असते. ते शरीरात गेल्यास त्यातून आरजिनीन आणि नायट्रस ऑक्साईड बनते जे हृदयाचे आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते. ते आपण टाकून देतो. तेच सुशोभनने केले ते बघून मला केशवसुतांची कविता आठवली. त्यात थोडा बदल करून म्हणावेसे वाटते ‘सत्व पाखडिता आम्हि, निवडितो ते फोल आम्ही निके’