मुंबई - नुसते बसू नका थोडा व्यायाम करा, व्यायाम नाही तर किमान थोडं चाला तरी असं आपल्या कानावर सारखं पडत असतं. सर्वात सोपा चकटफू किंवा सोपा व्यायाम कोणता असेल तर तो चालणे, हे आपल्या कानावर येत असतंच. पण ते फारसं मनावर घेतलं जात नाही.
कधीतरी चालायला जाणं, आठवड्यातून एखाद दिवशी चालणं किंवा एकआड दिवस चालणं अशाप्रकारे चालणं होत असेल तर त्याचा फारसा उपयोग होत नाही. इतकंच नव्हे जर आपलं चालणं बेशिस्त आणि 'दिशाहिन' असेल तर त्याचाही फारसा उपयोग होत नाही. म्हणून आजकाल व्यायामाचे तज्ज्ञ किंवा डॉक्टर्स शास्त्रशुद्ध अशा ब्रिस्कवॉकचा सल्ला देतात.
आता ब्रिस्कवॉक म्हणजे दुसरंतिसरं काही वेगळं नसून तो वेगवान चालण्याचाच एक भाग आहे. जॉगिंग आणि चालणे यांच्यामधली ही गती असते. ब्रिस्कवॉकमध्ये साधारणत: १२ मिनिटांमध्ये एक किलोमीटर अशा गतीने चालणे अपेक्षित असते.
सकाळी उठल्यावर मित्र किंवा मैत्रिणीच्या घराखालून हाका मारणे, त्याचं आवरेपर्यंत त्याच्याच घरी आणखी एकदा चहा घेणे मग गेल्या चारदिवसांचा गप्पांचा बॅकलॉग भरून काढत रमतगमत पाय ओढत चालायचं, मग पुन्हा चालून झाल्यावर चहा-क़ॉफी किंवा मिसळ-वडे खायचे, फुलं तोडायची अशी तुमची सकाळी 'फिरायला' जाण्याची व्याख्या असेल तर असल्या फिरण्याचा काहीच उपयोग होत नाही. चालण्याचा खरंच उपयोग व्हायचा असेल तर काही शिस्त पाळलीच पाहिजे.
१) चालण्यासाठी तुमच्याकडे चांगले, योग्य आकाराचे शूज तुमच्याकडे असणं कधीही चांगलं.
२) चालताना तुमचे शरीर आणि पाठ ताठ असू द्या. पोक काढून चालू नका.
३) चालताना तुमची नजरही थेट डोळ्यांच्या रेषेत हवी, चालताना तुमचे हातसुद्धा हलले पाहिजेत.
तुम्ही चालायला सुरुवात कराल तेव्हा आपपण काही सुपरमॅन आहोत अशा अविर्भावात चालायला सुरुवात करु नका. पहिल्याच दिवशी मला काय होतंय, हे तर एकदम सोपंय असं समजून फार दूरवर आणि भरपूर वेगाने चालू नका. यामुळे तुमचे पाय तर दुखतीलच त्याहून तुम्ही दुसऱ्या दिवशीच चालण्यासाठी उठायला कंटाळा करु लागाल.
शूज घातले की चला वेगाने चालणं सुरु असंही योग्य नाही. कोणत्याही व्यायामासाठी वॉर्म अप आवश्यक असतो त्याप्रमाणे सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये थोड्या संथ गतीने चाला. मग हळूहळू वेग वाढवा. चालणं थांबवतानाही हेच करायचं आहे. तसेच चालणं थांबवताना गती हळूहळू कमी करुन थांबले पाहिजे.
वॉर्म अप आणि कूल डाऊन हे व्यायामाइतकेच अत्यंत महत्त्वाचे आहेत हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे तुम्हाला गुडघेदुखी, मधुमेह, रक्तदाबाचे विकार तसेच कोणताही आजार असेल तर चालण्याचा किंवा कोणताही व्यायाम सुरु करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. तुमचे वजन, उंची, तब्येतीचा इतिहास यावरुन तुम्हाला सुयोग्य असा व्यायाम सुचवतील.