HEALTH : मुलांना कांजण्या झाल्यात?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2017 10:00 AM
कांजण्या हा संसर्गजन्य आजार असून सहसा शाळकरी म्हणजे ५ ते १० वर्षांच्या मुला-मुलींमध्ये जास्त प्रमाणात आढळतो.
कांजण्या हा संसर्गजन्य आजार असून सहसा शाळकरी म्हणजे ५ ते १० वर्षांच्या मुला-मुलींमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. आधीच्या काळी गोवरचे प्रमाण इतके होते की अजूनही अंगावर लाल चट्टे दिसले की, तो आजार गोवरच वाटतो. पण गोवर आणि कांजण्यांच्या अंगांवर येणाऱ्या चट्टयामध्ये एक मूलभूत फरक असतो. गोवरामध्ये अंगावर रंगाचा डब्बा ओतल्यावर तो जसा अंगावरून खाली जाईल, तसे अंगावरील पुरळ खाली सरकत जाते आणि कांजण्यांमध्ये सूर्य उगवतो तसे छातीच्या मध्यावरून पुरळ उगवते. काय काळजी घ्याल?कांजण्या हा मुदतीचा आजार असून कुठल्याही विषाणूजन्य आजारासारखा तो आपोआप बरा होतो. यादरम्यान जेवण थोडे कमी जात असेल तरी हरकत नाही, पण भरपूर पाणी प्यावे. या आजाराच्या काळात पचनशक्ती मंदावते म्हणून भूक कमी होते. यासाठी फळे-फळांचा रस देऊ शकता. सुरुवातीच्या चार-पाच दिवस अंगावरचे हे फोड वाढत जातात. फोड वाढले म्हणून घाबरण्याची गरज नसते. ते कमी आपोआप कमी होतात. त्यांना खाज येते म्हणून तुर्तास खाज कमी होण्याची औषधे घेता येतील. या दरम्यान मुलाच्या बोटांची नखे कापून घ्यावीत. कारण फोडांना खाजवल्यामुळेच जंतुसंसर्ग होतो.या फोडांमुळे चेहऱ्यावर व्रण पडतील अशी भीती असते मात्र सहसा संसर्ग झाला नाही तर व्रण पडत नाहीत. पडले तरी काही आठवड्यात जातात. विशेष म्हणजे एकदा कांजण्या झाल्या की तेच लसीकरण ठरते आणि परत कांजण्या होत नाहीत. मात्र लहानपणीच कांजण्या होण्याअगोदर लसीकरण करुन घेणे योग्य असते.