Health : व्यायामापूर्वी आणि व्यायामानंतर काय खावे, माहित आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2017 9:57 AM
व्यायाम कुठल्याही प्रकारचा असो, त्याला योग्य आहाराची जोड मिळाली नाही तर आपण करीत असलेल्या व्यायामाचे आपल्या मनासारखे परिणाम आपल्या शरीरावर होत नाहीत.
जवळपास सर्वच सेलिब्रिटी आपल्या फिटनेससाठी व्यायामाबरोबरच योग्य डायटलादेखील अति महत्त्व देत असतात. कारण व्यायाम कुठल्याही प्रकारचा असो, त्याला योग्य आहाराची जोड मिळाली नाही तर आपण करीत असलेल्या व्यायामाचे आपल्या मनासारखे परिणाम आपल्या शरीरावर होत नाहीत. त्यामुळे व्यायामाच्या पूर्वी आणि व्यायामानंतरचा आपला आहार काय असावा हे काळजीपूर्वक ठरविणे गरजेचे आहे.सुप्रसिद्ध फिटनेस तज्ज्ञ लीना मोगरे यांच्या मते, व्यायाम सुरू करण्यापूर्वी आणि व्यायामानंतर शक्यतो कॉम्प्लेक्स कर्बोदकांचे सेवन करावे. या आहारामुळे आपल्या शरीराला किमान दोनशे कॅलरीज मिळणे आवश्यक आहे असे तज्ञांचे मत आहे. व्यायामापूर्वीच्या आहारामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असणारा आहार घ्यावा आणि व्यायामानंतरच्या आहारामध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असावयास हवे.व्यायामापूर्वीचा आहार अतिशय महत्वाचा असतो. हा आहार व्यायामापूर्वी पंधरा ते वीस मिनिटे आधी सेवन करावा. रिकाम्यापोटी व्यायाम करणे टाळावे कारण व्यायामासाठी आवश्यक उर्जा शरीरामध्ये अन्नाशिवाय येऊ शकत नाही. त्यामुळे व्यायामापूर्वी केळे किंवा उकडलेला बटाटा या सारख्या पदार्थांचे सेवन करावे. या स्वरूपामध्ये आपल्या शरीराला मिळत असेलेली कॉम्प्लेक्स कर्बोदके आपल्या शरीरामध्ये पुष्कळ काळाकरिता हळूहळू उर्जा निर्माण करीत राहतात. त्यामुले व्यायामासाठी आवश्यक उर्जा सातत्याने शरीरामध्ये तयार होत राहते. एखाद्या व्यक्तीला जेवणाच्या शिवाय अधेमध्ये काहीही न खाण्याची सवय असते. अश्या वेळी व्यायामाच्या किमान दोन तास आधी भोजन करून घेणे योग्य असते. त्यामुळे अन्न व्यवस्थित पचविण्यासाठी शरीराला पुरेसा अवधी मिळतो.आपण कमी इंटेंसिटी ( तीव्रता ) किंवा कमी शारीरिक श्रम आवश्यक असलेला व्यायाम करणार असाल तर अंडे, टोस्ट, ओटमील, अश्या प्रकारचा नाश्ता व्यायामापूर्वी घ्यावा. जर आपण मध्यम इंटेंसिटी चा व्यायाम करणार असाल, तर ताजी फळे आणि त्यासोबत ओट्स, ताज्या भाज्या चिरून घालून केलेले अंड्याचे आॅमलेट, अश्या प्रकारचा नाश्ता घ्यावा. आपण करीत असेलेला व्यायाम जर अतिशय तीव्र इंटेंसिटीचा असेल तर व्यायामापूर्वीच्या नाश्त्यामध्ये पास्ता, फळे, दही , प्रोटीन पावडर घालून दूध अश्या प्रकारचा नाश्ता घ्यावा.