वजन वाढण्याची अनेक कारणे आहेत. फास्ट फूड खाणे, सतत बाहेरचं खाणे, सतत जड पदार्थ खाणे, शारीरिक श्रम कमी केल्याने तसेच सतत बसून राहिल्यानेही वजन वाढतं. याव्यतिरिक्त आणखी एक कारण असून हे कारण तुम्हाला धक्का देणारं ठरु शकतं. एका अभ्यासानुसार, जे लोक प्रेमात असतात त्यांचं वजन वाढू शकतं.
तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, जेव्हा लोक प्रेमात असतात तेव्हा त्यांचं खाण्या-पिण्याकडे लक्ष नसतं. त्यामुळे त्या लोकांना बारीक होतोय...प्रेमात आहेस का? असंही म्हटलं जातं. पण या अभ्यासाने हे स्टेटमेंट अगदी चुकीचं ठरवलंय. या अभ्यासानुसार, जे लोक प्रेमात असतात त्यांचं वजन वाढतं.
ऑस्ट्रेलियाच्या सेंट्रल क्वीलॅंड यूनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, जेव्हा लोक कुणासोबत प्रेमाच्या नात्यात असतात किंवा कुणावर प्रेम करत असतील तेव्हा त्यांचं वजन वाढण्याची शक्यता अधिक असते.
अभ्यासकांनी या अभ्यासात जवळपास १५ हजारपेक्षा जास्त लोकांना सहभागी करुन घेतले होते. त्यांनी या अभ्यासात सहभागी पुरुष आणि महिलांच्या बॉडी मास इंडेक्स (BMI)ची तुलना केल्यानंतर निष्कर्ष घोषित केले. या अभ्यासात वेगवेगळ्या जीवनशैलीच्या सिंगल आणि कपल्स दोघांनाही सहभागी करुन घेतले होते.
काय आहे वजन वाढण्याचं कारण?
अभ्यासादरम्यान अभ्यासकांना आढळलं की, प्रेम आणि वजन यांचं एकमेकांशी जवळचं नातं आहे. जेव्हा लोक कुणासोबत नात्यात असतात तेव्हा काही महिन्यांनी किंवा वर्षांनी त्यांच्यातील आपल्या पार्टनरला इम्प्रेस करण्याची भावना संपुष्टात येते. स्वत:वर लक्ष देण्याच्या कारणाने नकळत त्यांचं वजन वाढू लागतं.
यामुळे वाढतं कपल्सचं वजन
- वजन वाढण्याचं एक मुख्य कारण हेही आहे की, जे लोक प्रेमात असतात ते लोक जीममध्ये जाऊन एक्सरसाइज करण्यापेक्षा जास्त वेळ पार्टनरसोबत घरीच घालवण्यात जास्त पसंत करतात. बदलती जीवनशैलीही वजन वाढण्याचं एक मुख्य कारण आहे.
- जेव्हा लोक प्रेमात असतात तेव्हा खूप आनंदी असतात आणि नातं नवीन असेल तर हा आनंद दुप्पट असतो. जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपल्या शरीरातील हॅप्पी हार्मोन् ऑक्सिटोसिन आणि डोपामाइन सक्रिय होतात. या हॅप्पी हार्मोन्समुळे चॉकलेट, वाइन आणि जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते. हेच पदार्थ तुमचं वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात.