- डॉ. अभिजित देशपांडे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेस
घनश्याम सरोदे (नाव बदललेले) हे ५२ वर्षांचे गृहस्थ. मल्टिनॅशनल कंपनीत उच्चपदस्थ नोकरी, घरी बायको, मुलगा आणि मुलगी असा चौकोनी कारभार. टापटिपीची आणि व्यवस्थितपणाची आवड. कामाला वाघ, पटपट निर्णय घेणारा माणूस अशी ऑफिसमध्ये ख्याती! पण, गेल्या पाच वर्षांमध्ये हा वेग थोडा मंदावला होता. ऑफिसमधली मिटिंग थोडी लांबली तर सरोदे साहेबांना जबरदस्त पेंग येऊ लागायची. घरातली अनेक कामे लांबणीवर पडू लागल्याने बायकोदेखील नाराज! सुट्टीच्या दिवशीदेखील सरोदे झोप काढत, त्यामुळे कुटुंब नाराज होते. सरोदे यांना व्यायामाची आवड; पण गेल्या दोन वर्षांत थकव्यामुळे इच्छाच होत नव्हती. वजनदेखील दहा पौंडांनी वाढले. या सगळ्या परिस्थितीचे कारण त्यांच्या मते अगदी स्पष्ट होते. कामाचा व्याप, वाढत्या वयामुळे थकवा येतोय, त्यामुळे काही गोष्टी आपल्या हातून होणार नाहीत ही बाब कुटुंबीयांनी समजून घ्यावी, असे सरोदेंना प्रामाणिकपणे वाटे.‘झोपाळूपणा’ म्हणजे आळशी असल्याचे लक्षण अशी आपल्या भारतीयांची मनोधारणा आहे. त्यामुळे भारतीयांना “तुमचा झोपाळूपणा वाढला आहे का?” असे विचारले तर बरेचदा उत्तर नकारार्थी येते. याउलट “तुमचा थकवा (फटीग) हल्ली वाढला आहे का?”- याचे उत्तर “होय” असे अनेक लोक देतील. थकवा आहे याचाच अर्थ मी कामसू आहे आणि आळशी नाही हे स्पष्टीकरण कोणालाही आवडेल. झोपाळूपणा अथवा थकवा वाढण्याची कारणे आपण बाह्य गोष्टीमध्ये (वृद्धपणा, तणाव, कामाचा व्याप) शोधतो; पण एका महत्त्वाच्या कारणाकडे दुर्लक्ष करतो. ती बाब म्हणजे ‘झोपेची क्वालिटी’! आपल्या थकव्यामागे मुख्य कारण झोपच आहे हे लक्षातच येत नाही. घनश्याम सरोदे यांच्या बाबतीत त्यांच्या परिस्थितीला झोपेतील बाबीच कारणीभूत होत्या. एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये सरोदेंना झोप अनावर झाली आणि सगळ्यांसमोर ते चक्क घोरू लागले. या प्रसंगानंतर सरोदे यांनी वैद्यकीय सल्ला घेतलाच आणि गुगलवरदेखील संशोधन केले. काय प्रकार चालू होता सरोदे यांच्या झोपेत? याची सविस्तर चर्चा करूयात, पुढच्या शुक्रवारी, याच ठिकाणी!iissreports@gmail.com